Breaking Ticker

सोनाळा ग्रामपंचायतीतील नियमबाह्य भरतीप्रकरणी संताप.



सुमेध दामधर  संग्रामपूर ( प्रतिनिधी):

सोनाळा ग्रामपंचायतीमध्ये शासन नियमांचे उल्लंघन करून करण्यात आलेल्या कथित नियमबाह्य कर्मचारी नियुक्तीप्रकरणी ग्रामसेविकेच्या निलंबनाची मागणी आता जोर धरू लागली आहे. युवाशक्ती ग्रामविकास संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद बुलढाणा येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित ग्रामसेविकेने कर्मचारी भरती करताना कोणतीही सार्वजनिक जाहिरात प्रसिद्ध केली नाही. तसेच पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया देखील राबविण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, निवड प्रक्रियेत गुणांकन पद्धती, लेखी परीक्षा किंवा मुलाखत यांसारख्या कोणत्याही अधिकृत निकषांचा अवलंब न करता मनमानी पद्धतीने नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे समान संधीच्या तत्त्वाचा भंग झाल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, ‘आपले सरकार’ पोर्टलवर ग्रामपंचायतीकडून “कोणतीही नवीन भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही” अशी माहिती देण्यात आलेली असताना प्रत्यक्षात कर्मचारी नियुक्ती करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासन अभिलेखांमध्ये जाणीवपूर्वक चुकीची व दिशाभूल करणारी माहिती नोंदविण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 53, 54 व 39 तसेच भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 166 व 167 चे उल्लंघन झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता भरती प्रक्रिया राबविण्यात आल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, सदर प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ग्रामसेविकेला तात्काळ निलंबित करण्यात यावे, तसेच दोषी आढळल्यास संबंधितांवर कडक शिस्तभंग कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे सोनाळा परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पारदर्शक व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.