जव्हार, प्रतिनिधी कल्पेश लोखंडे
आदिवासी, ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी कार्यरत डॉन बॉस्को सामाजिक विकास संस्थेचे जव्हार तालुक्यातील वाळवंडा येथे नूतन निवासी इमारत व प्रशासकीय कार्यालयाचे उदघाट्न शुक्रवार 10 जुलै 2026 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उल्हासात संपन्न झाले.
कार्यक्रमाची सुरुवात फित कापून आणि उदघाटन फलकाचे अनावरण करून करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरानी नवीन इमारतीची पाहणी केली, आकर्षक फुले, फुलांची सजावट आणि उत्साही वातावरणामुळे संपूर्ण परिसर आनंदमय झाला होता, कार्यक्रमाच्या प्रारंभी दिपप्रज्वलन करून संत डॉन बॉस्को यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उदघाटन सोहळा पार पडला.
यावेळी प्रोव्हीन्शियल फादर मिरांडा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,"डॉन बॉस्को सामाजिक संस्थेचे कार्य हे केवळ इमारती उभारण्या पुरते मर्यादित नसून, आदिवासी समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे हेच आमचे ध्येय आहे, नवीन निवासी इमारत व प्रशासकीय कार्यालया मुळे शिक्षण, कौशल्य विकास आणि समाजसेवेचे कार्य अधिक व्यापकपणे करता येईल."
फादर जेसु रॉबिन्सन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "आशा, विश्वास आणि समजसेवेचे प्रतीक आहे या माध्यमातून युवक, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक परिणामकारक उपक्रम राबविता येतील. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेत्येकाने एकत्रितपणे कार्य करण्याची गरज आहे."
यानंतर प्रमुख पाहुण्यांनी डॉन सामाजिक विकास संस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाजातील शिक्षण, कौशल्य विकास,महिला सक्षमिकरण, युवक नेतृत्वविकास, उपजीविका निर्मिती आणि सामाजिक परिवर्तनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. नवीन निवासी इमारत प्रशासकीय कार्यालयामुळे संस्थेच्या विविध विकासात्मक उपक्रमाना अधिक बळ मिळेल तसेच दुर्गम भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण झोले व अलका पाटारा यांनी केले प्रास्ताविक चंद्रकांत गांगुर्डे यांनी केले, तर आभार प्रदर्शन फादर मॉन्टी यांनी केले.
