ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; कोरपना येथे पक्षप्रवेश सोहळा
दैनिक समीकरण कोरपणा ता. प्र : जगन्नाथ पिदुरकर
काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले सुभाष काका तुराणकर आणि ईश्वर सुभाष तुराणकर यांनी पुन्हा शेतकरी संघटनेत प्रवेश करीत घरवापसी केली. माजी आमदार तथा शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत त्यांनी भाजपला रामराम ठोकला. मंगळवारी (दि. ३ नोव्हेंबर) कोरपना येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
कोरपना येथे आयोजित कार्यक्रमात ॲड. वामनराव चटप यांच्या प्रमुख उपस्थितीत सुभाष तुराणकर व ईश्वर तुराणकर यांनी शेतकरी संघटनेचा झेंडा पुन्हा हाती घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे कोरपना तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या या दोघांनी पुन्हा शेतकरी संघटनेत परतण्याचा निर्णय घेतल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नवले, तालुकाध्यक्ष ॲड. श्रीनिवास मुसळे, संघटनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मुसळे, रमा पाटील मालेकर, अनंताभाऊ गोडे, अविनाश मुसळे, नादिर कादरी, शारीक अली, संदीप टोंगे, गणेश तुराणकर, गणपत गोडे, प्रवीण रासपल्ले, सौरभ राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
सुभाष तुराणकर व ईश्वर तुराणकर यांच्या घरवापसीमुळे कोरपना परिसरात शेतकरी संघटनेची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. या प्रवेशामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
