Breaking Ticker

चर्मकार समाजाच्या वतीने उपनगराध्यक्षांना निवेदन; दुकानांची जागा वाढवून देण्याची मागणी.



शहादा,दि.२३ (प्रतिनिधी)

    शहादा शहरातील खेतिया रोड चार रस्ता परिसरात गेल्या ५० वर्षांपासून पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या चर्मकार समाज बांधवांनी आपल्या व्यवसायाची जागा वाढवून मिळावी, या मागणीसाठी पालिकेच्या उपनगराध्यक्षा सौ. माधवीताई मकरंद पाटील यांना शुक्रवारी (दि. २३) सविस्तर निवेदन दिले. चर्मकार समाजाचे अध्यक्ष आणि सचिवांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले.

*५० वर्षांपासूनचा वारसा आणि जागेची अडचण-*

    शहादा शहरातील खेतिया रोड चार रस्ता भागात, पाण्याच्या टाकीच्या दक्षिण दिशेला चर्मकार समाजाची बूट-चप्पल दुरुस्ती आणि विक्रीची छोटी दुकाने आहेत. ही दुकाने साधारण ४x४ क्षेत्रफळाची असून, समाज बांधव गेल्या ५० वर्षांपासून या ठिकाणी आपला वडिलोपार्जित व्यवसाय करत आहेत. या बदल्यात ते नियमितपणे नगरपालिकेकडे कर भरणा देखील करत आले आहेत. मात्र, सध्याची ४ बाय ४ ची जागा व्यवसायासाठी अत्यंत अपुरी पडत असल्याने व्यावसायिकांची मोठी कुचंबणा होत आहे.

*ग्राहकांची गैरसोय आणि रहदारीचा प्रश्न-*

निवेदनात नमूद केल्यानुसार, जागेच्या कमतरतेमुळे व्यावसायिकांना आपले साहित्य ठेवण्यास अडचण येत आहे. दुकाने अत्यंत लहान असल्याने ग्राहकांना रस्त्यावर उभे राहून सेवा घ्यावी लागते. यामुळे उन्हापावसाचा त्रास तर होतोच, शिवाय रस्त्यावर वाहने उभी राहिल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. ही समस्या सोडवण्यासाठी दुकानांच्या मागे असलेल्या पालिकेच्या पाण्याच्या टाकीकडील रिक्त जागेपैकी किमान ५ फूट जागा वाढवून मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

*पालिकेचे नुकसान नाही, कर भरण्यास तयार-*

व्यावसायिकांनी स्पष्ट केले की, पाण्याच्या टाकीला लागून कोणतेही पक्के बांधकाम नसल्याने ही ५ फूट जागा वाढवून दिल्यास पालिकेचे कोणतेही तांत्रिक नुकसान होणार नाही. उलट, जागा वाढवून मिळाल्यास नगरपालिका नियमानुसार वाढीव वार्षिक कर भरण्यास सर्व चर्मकार व्यावसायिक तयार आहेत. यामुळे शहराचे विद्रुपीकरण थांबण्यास आणि शिस्तबद्ध व्यवसाय करण्यास मदत होईल.

      हे निवेदन देताना चर्मकार समाजाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक हिरालाल सोमा अहिरे, सचिव तुकाराम गबा अहिरे यांच्यासह प्रकाश मोतीलाल अहिरे, मंगल चिंधू अहिरे, चिंधू गिरधर अहिरे, गुताबाई फकीर अहिरे, मनोज अर्जुन अहिरे, चंद्रकांत लक्ष्मण अहिरे, सुभाष चिंतामण अहिरे, गबा चिंतामण अहिरे, गोविंद मधुकर अहिरे, सुमनबाई मधुकर अहिरे, सोनू गोपाल अहिरे यांसह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

उपनगराध्यक्षा सौ.माधवीताई पाटील यांनी या प्रश्नी सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.