सुमेध दामधर तालुका प्रतिनिधी
संग्रामपूर (१५ एप्रिल २०२६): दिनांक १४ एप्रिल २०२६ रोज मंगळवार ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोनाळा येथील पोलीस स्टेशनमध्ये अभिमान, आदर आणि उत्साहाच्या वातावरणात जयंती सोहळा मोठ्या आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कर्तव्यदक्ष ठाणेदार संदीप काळे सर यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून करण्यात आली. त्यानंतर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी उभे राहून बाबासाहेबांच्या कार्याला मानवंदना दिली. यावेळी ठाणेदार संदीप काळे यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता, न्याय आणि बंधुतेचा संदेश आजही समाजासाठी दिशादर्शक आहे.
त्यांच्या विचारांवर चालत आपण समाजात एकोपा आणि कायद्याचा सन्मान टिकवणे आवश्यक आहे.” कार्यक्रमात पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच गावातील मान्यवर नागरिक, समता नवयुवक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. सोहळ्यादरम्यान वातावरण अत्यंत प्रेरणादायी व उत्साही होते. अनेकांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या संघर्षमय वाटचालीचे स्मरण केले. तसेच समाजातील दुर्बल घटकांसाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सामाजिक समता, न्याय आणि बंधुता जपण्याचा निर्धार व्यक्त केला. या जयंती उत्सवामुळे सोनाळा परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.
