उरुवेला बुद्ध विहारातून निघालेल्या रॅलीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद; “जय भीम” च्या घोषणांनी दणाणला परिसर
सुमेध दामधर | तालुका प्रतिनिधी
सोनाळा (दि. १६ एप्रिल २०२६) – संग्रामपूर तालुक्यातील संत नगरी सोनाळा येथील उरुवेला बुद्ध विहार, सोनाजी नगर येथे यावर्षी प्रथमच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त व अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून संपूर्ण परिसर “जय भीम” च्या घोषणांनी दुमदुमून गेला. या अभिवादन कार्यक्रम मिरवणुकीची सुरुवात उरुवेला बुद्ध विहार सोनाजी नगर येथून विधिवत पूजनाने करण्यात आली. भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची मंगल सुरुवात झाली. यानंतर आकर्षक सजवलेल्या ‘भीम रथातून’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा अभिवादन कार्यक्रम मिरवणुकीत सहभागी करण्यात आली. या अभिवादन मिरवणुकीत युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. साऊंड DJ च्या गजरात आणि निळ्या पताकांनी सजलेली ही रॅली प्राथमिक आरोग्य केंद्र, बस स्टँड मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर त्याच मार्गाने परत येत हनुमान मंदिर, सोनाजी नगर येथून प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे युवकांनी दिलेले जोशपूर्ण घोषवाक्ये, सामाजिक संदेश देणारे फलक आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभावी प्रचार-प्रसार. त्यामुळे संपूर्ण वातावरण प्रेरणादायी व भारावलेले दिसून आले. या उपक्रमाचे नियोजन समता नवयुवक मंडळ, सोनाजी नगर यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले. कायद्याचे कोणतेही उल्लंघन होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली होती. आयोजकांनी सांगितले की, “उरुवेला बुद्ध विहार येथे प्रथमच मिरवणूक काढण्याचा हा उपक्रम असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकडे विशेष लक्ष देण्यात आले. स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात साथ दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक नागरिक, युवक मंडळ तसेच महिला बचत गटांनी विशेष परिश्रम घेतले. मिरवणूक शांततेत, शिस्तीत आणि उत्साहात पार पडल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
