Breaking Ticker

“ज्ञानदीप प्रज्वलित! सोनाजी नगर शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी”



सुमेध दामधर तालुका प्रतिनिधी 

संग्रामपूर (१५ एप्रिल २०२६) : तालुक्यातील सोनाजी नगर, सोनाळा येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी, मंगळवारी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुमेध दामधर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्री. गणेश जामनेकर सर, वरिष्ठ शिक्षक भगवान बावणे सर, सह शिक्षक गजानन बावणे सर , सेवेकरी शिक्षक सागर भामद्रे सर, शिपाई गोरखनाथ डांगे तसेच सुजान नागरिक गणेश घुये, सोनाजी सहारे आदी मान्यवरांनी प्रतिमेस वंदन करून अभिवादन केले.

 या प्रसंगी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनचरित्रावर प्रकाश टाकत “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या महामंत्राचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांच्या विचारांनी विद्यार्थ्यांच्या मनावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे चित्र दिसून आले. कार्यक्रमात शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी, असा मोलाचा संदेश देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले गेले. या कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रामस्थ तसेच शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला अधिकच उंची प्राप्त झाली. एकूणच, ज्ञान, समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारी ही जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.