वरवंड गावात येणाऱ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी ग्रामपंचायतीकडून विविध सोयी-सुविधांची व्यापक तयारी करण्यात आली आहे. वारकऱ्यांना मुक्कामादरम्यान कोणतीही अडचण भासू नये, यासाठी ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे.
वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधांमध्ये विसाव्यासाठी पालखी तळ व बाजार मैदान येथे दोन सुसज्ज मोठे जर्मन टेंट उभारण्यात आले असून त्यामध्ये वारकरी बांधवांना विश्रांतीसाठी जमिनीवर कारपेट वातानुकुलीत राहण्यासाठी फॅन तसेच आंघोळीसाठी ३०० शॉवरची व्यवस्था करण्यात आली आहे.
महिला वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र १५० बाथरूमची व्यवस्था करण्यात आली असून, गावात विविध ठिकाणी १,२०० फिरते शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गावातील रस्त्यांवर तसेच महत्त्वाच्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच वारकऱ्यांच्या टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाच्या वतीनेही वारकऱ्यांसाठी विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सदरील सुविधांबाबतची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली.
