उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाईकडून वारकऱ्यांचे स्वागत, फराळ वाटप व रस्ता सुरक्षा जनजागृती
अंबाजोगाई प्रतिनिधी:विशाल जोगदंड
आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यानिमित्त उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाई यांनी शासकीय सेवेसोबत सामाजिक बांधिलकी जपत समाजहिताचा आदर्श उपक्रम राबविला. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विनोद साळवी यांच्या तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री सिद्धेश्वर घुले यांच्या पुढाकाराने शनिवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी लातूर–छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत सम्राट चौक, लोखंडी सावरगाव (लातूर रोड) येथे शेगाव ते पंढरपूर तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांतून पायी वारीसाठी निघालेल्या विविध पालख्या व हजारो वारकऱ्यांसाठी फराळ वाटप तसेच रस्ता सुरक्षा जनजागृतीचा व्यापक उपक्रम उत्साहात पार पडला.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सेवेसाठी तसेच त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून हा उपक्रम राबविला. कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि वाहन प्रतिनिधींनी स्वतः उपस्थित राहून वारकऱ्यांचे स्वागत केले व फराळाचे साहित्य वितरित केले. वारकऱ्यांनीही या सेवाभावी उपक्रमाचे मनापासून स्वागत करत परिवहन विभागाच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले.
यावेळी रस्ता सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय केंद्रस्थानी ठेवण्यात आला. वारकऱ्यांना रस्त्यावर सुरक्षितपणे चालण्याचे नियम, वाहतुकीच्या दिशेचे पालन, महामार्ग ओलांडताना घ्यावयाची खबरदारी, रात्रीच्या वेळी परावर्तित (रिफ्लेक्टर) साहित्याचा वापर, वाहनांपासून सुरक्षित अंतर राखणे, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेणे, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणारी माहितीपत्रके वारकऱ्यांना वाटण्यात आली.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विनोद साळवी यांनी सांगितले की, परिवहन विभागाचे कार्य केवळ वाहन प्रशासनापुरते मर्यादित नसून नागरिकांमध्ये सुरक्षित वाहतुकीची जाणीव निर्माण करणे आणि समाजोपयोगी उपक्रम राबविणे हे देखील विभागाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. आषाढी वारीसारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होत असल्याने प्रत्येक वारकऱ्यापर्यंत रस्ता सुरक्षेचा संदेश पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. सुरक्षित वारी हीच खरी सेवा असून अपघातमुक्त प्रवासासाठी प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमामध्ये मोटार वाहन निरीक्षक श्री प्रशांत वनवे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री ज्ञानेश्वर कांबळे, श्री अक्षय कातळे, श्रीमती ऐश्वर्या कराड, लिपिक श्री सिद्धेश्वर घुले, श्री दिलीप सुरवसे, व इतर सर्व कर्मचारी तसेच श्री रवी मुळे, श्री सुरेश माने, श्री अशोक मोरे, श्री प्रशांत डोरले, श्री पवन लाहोटी, श्री आकाश काळे, श्री मोरे मामा, श्री अकबर शेख, शेरू भाई, श्री अशोक पवार, श्री मुकुंद जोशी, श्री स्वप्निल घाडगे आणि इतर सर्व वाहन प्रतिनिधींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
सदर उपक्रमाला परिसरातील नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शासकीय यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी आणि वाहन प्रतिनिधी यांनी एकत्रितपणे समाजहितासाठी केलेल्या या सेवाभावी कार्यामुळे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाईची समाजाभिमुख भूमिका अधिक अधोरेखित झाली. सेवाभाव, जनजागृती, रस्ता सुरक्षा आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा सुंदर संगम घडविणारा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविण्यात या उपक्रमाला मोठे यश मिळाले.
