मुंबई : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील मुख्य आकर्षणाचा भाग म्हणजे २१ किमी लांबीचा वांद्रे – कुर्ला संकुल ते शिळ फाटा बोगदा. या बोगद्याच्या कामासाठी आर्थिक निविदा उघडण्यात आल्या आहेत. तसेच २१ किमी लांबीच्या बोगद्यापैकी ठाणे खाडीतून जाणारा ७ किमी लांबीचा बोगदा देशातील पहिला समुद्राखालील बोगदा ठरणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २१ किमी लांबीच्या बोगद्याच्या कामासाठी आर्थिक निविदा उघडल्या असून सी-२ पॅकेजच्या या कामासाठी दोन कंपन्यांनी निविदा भरली आहे. मे.अफ्कॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सर्वात कमी बोली लावली आहे.
मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग ५०८ किमी लांबीचा असून सुरुवातीचे वांद्रे -कुर्ला संकुल स्थानक भूमिगत आहे. वांद्रे-कुर्ला संकुल ते शिळ फाटय़ापर्यंत २१ किमी लांबीचा बोगदा खणण्यासाठी टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) आणि न्यू ऑस्ट्रियन टनेिलग पद्धत याचा वापर करण्यात येणार आहे. बुलेट ट्रेनसाठी खोदण्यात येणारा बोगदा अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गासाठी एकच असणार आहे. सी – २ पॅकेजमध्ये बोगद्याच्या जवळ आसपास ३७ ठिकाणांवर ३९ उपकरणांच्या खोलीची निर्मिती केली जाणार आहे. बोगद्यासाठी १३.१ मीटर व्यासाच्या कटर हेड टीबीएम मशीनचा वापर केला जाणार आहे.
