Breaking Ticker

गुजरीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा? शासन निर्णयाला हरताळ फासून ६५ किमी दूर शाळा स्थलांतराचा आरोप;

 

 

ग्रामपंचायतीचा ठरावही नाही, गावकऱ्यांत संताप*

ग्रामीण प्रतिनिधी गुजरी स्वप्नील घोटेकर

राळेगाव तालुक्यातील गुजरी येथील राजश्री शाहू महाराज विद्यालय यांच्या प्रस्तावित स्थलांतर प्रकरणाने आता गंभीर वादाचे स्वरूप धारण केले असून संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी निगडित असलेल्या या महत्त्वाच्या शाळेचे स्थलांतर नियमबाह्य पद्धतीने करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाने जुलै २०२१ मध्ये काढलेल्या शासन निर्णयानुसार कोणत्याही शाळेचे स्थलांतर १० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर करता येणार नाही, असे स्पष्ट नियम असताना संबंधित अधिकाऱ्यांकडून या नियमाला बगल देण्यात आल्याचा आरोप होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरी येथील राजश्री शाहू महाराज विद्यालय तब्बल ६५ किलोमीटर अंतरावर स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव पुढे रेटला जात असल्याची चर्चा तालुकाभर सुरू आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून, ग्रामपंचायत गुजरीचा कोणताही अधिकृत ठराव न घेता तसेच स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांची संमती न घेता स्थलांतर प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप आता ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, गावातील शैक्षणिक, सामाजिक आणि सार्वजनिक हिताशी संबंधित इतका मोठा निर्णय घेताना ग्रामपंचायतीचा ठराव घेणे अपेक्षित असताना, तो न घेता परस्पर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने संशय अधिक गडद झाला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेची पारदर्शकता आता प्रश्नचिन्हाखाली आली आहे.

गुजरी परिसरातील अनेक गरीब, शेतकरी व मजूर कुटुंबातील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. जर ही शाळा इतक्या दूर स्थलांतरित करण्यात आली, तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होणार असून अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे.

ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला असून, “ग्रामपंचायतीचा ठराव नाही, गावकऱ्यांची संमती नाही, शासन नियमांचे पालन नाही… मग हे स्थलांतर नेमके कोणाच्या हितासाठी?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, संबंधित शाळेच्या स्थलांतरासाठी नेमकी कोणती कागदपत्रे सादर करण्यात आली? ग्रामपंचायतीचा ठराव नसताना प्रस्ताव कसा मंजूर झाला? शासनाची परवानगी घेतली आहे का? आणि १० किलोमीटरच्या नियमाचे उल्लंघन करून ६५ किलोमीटर अंतरावरील स्थलांतराला कोणाच्या आशीर्वादाने मंजुरी दिली जात आहे? असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच ग्रामपंचायतीची व गावकऱ्यांची भूमिका विचारात घेतल्याशिवाय कोणतेही स्थलांतर मंजूर करू नये, अशी जोरदार मागणी आता गुजरी ग्रामस्थांकडून होत आहे.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.