गोरेगाव प्रतिनिधी
गोरेगांव,पी.डी. राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे सुरू असलेल्या एच.एस.सी. बोर्ड परीक्षा २०२६ दरम्यान अत्यंत दुर्दैवी घटना घडली. विद्यालयातील विद्यार्थिनी कु. शालिनी छनीलाल पोंगळे हिच्या आई सौ. बबीता छनीलाल पोंगळे यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. आईच्या मायेची सावली हरवलेली असतानाही कु. शालिनीने अतोनात मानसिक वेदना सहन करत धैर्याने अर्थशास्त्र विषयाचा पेपर दिला. तिच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आईच्या निधनाचे दुःख पचवून शिक्षणाप्रती असलेली निष्ठा दाखवत शालिनीने परीक्षा देण्याचा घेतलेला निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता उभी राहण्याची तिची वृत्ती ही तिच्या चिकाटीचे द्योतक आहे.
या कठीण प्रसंगी शाळेतील संपूर्ण परिवार शालिनीच्या दुःखात सहभागी झाला. विद्यालयाचे प्राचार्य सी. डी. मोरगडे, पर्यवेक्षक ए. एच. कटरे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिचे सांत्वन केले व मानसिक आधार दिला. तसेच परीक्षा केंद्र संचालक प्रा. डी. बी. चाटे, सहाय्यक परीक्षक एल. जी. बारसागडे, वर्गशिक्षक प्रा. डी. एम. राठोड, वरिष्ठ सहाय्यक श्री. झामसिंग भोयर यांनीही सहानुभूती व्यक्त करत मदतीचा हात पुढे केला.
यावेळी विविध मान्यवर व समाजसेवकांनी आर्थिक व वस्तूरूप मदत केली. विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून ५०० रुपये, डॉ. सविता बेदारकर (समाजसेविका) यांच्याकडून ५००० रुपये तसेच दोन कट्टे तांदूळ व खाद्यतेलाचा एक टिन देण्यात आला. माजी सभापती श्रीमती आरती चवारे यांनी २००० रुपये, समाजसेविका श्रीमती स्नेहा कोल्हे यांनी ११०० रुपये, तर तुमखेडा येथील उपसरपंच श्रीमती सुषमा तुमसरे यांनी ११०० रुपयांची मदत देऊन सहकार्य केले.
या सर्वांच्या सहकार्यामुळे शालिनी व तिच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. पुढील शिक्षणासाठीही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन विद्यालय प्रशासन व समाजातील मान्यवरांनी दिले आहे.
विद्यार्थिनीच्या या धैर्यपूर्ण कृतीने संकटांवर मात करण्याची प्रेरणा दिली असून, समाजातील एकोप्याचे सुंदर उदाहरणही या निमित्ताने समोर आले आहे. दुःखाच्या क्षणी आधार देणारे हातच खऱ्या अर्थाने समाजाची ताकद असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.
