Breaking Ticker

दौंड तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा – अनेक खाजगी हॉस्पिटल्सचा लवकरच भांडाफोड



दौंड प्रतिनिधी:गणेश दिवेकर

दौंड तालुक्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे गडबडलेल्या स्थितीत असल्याचे चित्र समोर येत आहे. अनेक खासगी हॉस्पिटल्समध्ये गंभीर अनियमितता सुरू असून, संपूर्ण आरोग्य यंत्रणाच अक्षरशः गॅसवर असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकारांकडे आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचेही स्पष्ट होत आहे.

तालुक्यातील काही हॉस्पिटल्समध्ये बायो-मेडिकल वेस्टचे नियम धाब्यावर बसवून ते उघड्यावर टाकले जात आहे. एवढेच नव्हे तर हा धोकादायक कचरा उघड्यावरच जाळला जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या कृतीमुळे परिसरात विषारी धूर पसरून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत आहे.

यासोबतच, रुग्णांना चुकीचे व दिशाभूल करणारे उपचार देऊन आर्थिक लूट सुरू असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. त्याचबरोबर अनेक रुग्णालय स्वतःची मेडिकल स्टोअर चालवतात आणि औषधे त्याच मेडिकल मधून घेण्याची सक्ती पेशंटला केली जाते आणि जरी एखाद्या पेशंटने दुसऱ्या मेडिकल मधून औषध आणायचं म्हटलं तर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे दुसऱ्या मेडिकलमध्ये जवळपास मिळत नाहीत बऱ्याचदा असे चित्र स्पष्ट होते.                                                   अनावश्यक तपासण्या, महागडी औषधे आणि भीतीचे वातावरण निर्माण करून रुग्णांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. काही ठिकाणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवर मानसिक दबाव टाकण्याचे प्रकारही होत असल्याचे समोर आले आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे, या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले आरोग्य विभागातील अधिकारी मात्र सुस्त भूमिकेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की, या सर्व गैरप्रकारांना जबाबदार नेमके कोण?

या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, ठोस पुरावे गोळा करण्यात येत आहेत. लवकरच संबंधित हॉस्पिटल्स आणि जबाबदार अधिकाऱ्यांचा भांडाफोड करून सत्य समोर आणले जाणार आहे.

प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

(या प्रकरणाचा मोठा खुलासा लवकरच…)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.