दैनिक समीकरण दौंड प्रतिनिधी : गणेश दिवेकर
दौंड तालुक्यातील स्वामी-चिंचोली येथे ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गावातील ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेविका आणि सरपंच यांच्या संगनमतातून अपूर्ण व प्रत्यक्षात न झालेल्या कामांची बोगस बिले काढून सुमारे ९० लाख ते १ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
याप्रकरणी ग्रामस्थांनी दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे २३ मार्च २०२६ रोजी लेखी तक्रार अर्ज दाखल केला होता. संबंधित तक्रारीसोबत विविध कामांची कागदपत्रे, बिले, छायाचित्रे आणि कथित अनियमिततेचे पुरावे जोडण्यात आले होते. मात्र, तक्रार दाखल होऊन बराच कालावधी उलटून गेल्यानंतरही सखोल चौकशी अथवा अधिकृत अहवाल समोर आला नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गावातील रस्ते विकास, पथदिवे, धोबीघाट दुरुस्ती, वॉटर फिल्टर उभारणी, सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्मशानभूमी दुरुस्ती, गाव सुशोभीकरण, वॉल कंपाऊंड, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर खरेदी अशा विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळासाठी साहित्य खरेदीच्या नावाखालीही निधी मंजूर करून त्याची दोन-दोन बिले काढण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या मते, अनेक कामे प्रत्यक्षात पूर्ण होण्याआधीच त्यांची देयके अदा करण्यात आली. काही ठिकाणी तर कामे सुरूही नसताना “पूर्ण झाल्याचे” दाखवून कथित बनावट जिओ-टॅग फोटो जोडण्यात आले आणि संबंधित ठेकेदारांकडून बिले मंजूर करून घेण्यात आली. विशेष म्हणजे, तक्रार दाखल झाल्यानंतरच अनेक अपूर्ण कामांना घाईघाईने सुरुवात करण्यात आल्याचेही ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे.
या प्रकरणात ठेकेदारांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, एकाच महिन्यात मोठ्या प्रमाणावर थकीत बिले अदा करण्यात आल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. सरपंचांच्या नातेवाईकांचा आणि संबंधित ग्रामसेविकेचा या व्यवहारात सक्रिय सहभाग असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, पंचायत समिती प्रशासनाकडून या कथित बोगस बिलांची अद्याप अंतिम पडताळणी करण्यात आलेली नसल्याने संबंधित अधिकारी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, झालेल्या भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करावी, संबंधित ग्रामसेविकेला निलंबित करून कठोर शिक्षा द्यावी तसेच सरपंचांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले की, “महिला नेतृत्व गावाचा विकास करेल, अशी अपेक्षा होती. मात्र येथे महिला अधिकारी आणि पदाधिकारी यांनी संगनमत करून गावाच्या विकास निधीवर डल्ला मारल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.”
तक्रार दाखल झाल्यानंतरच अपूर्ण कामांना गती
ग्रामस्थांनी तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित अपूर्ण विकासकामांना अचानक गती देण्यात आल्याचे दिसून आले. मात्र, ही कामे निकृष्ट दर्जाची असून प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि गुणवत्तेबाबत अद्याप गंभीर प्रश्नचिन्ह कायम असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गटविकास अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
याबाबत दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी सांगितले की, “या प्रकरणाची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली असून पुढील तपासासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. संबंधित समितीला ३० तारखेपर्यंत मुदत देण्यात आली असून, त्या कालावधीत अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे.”
