पुणे जिल्हा प्रतिनिधी(29मे)-
वाकड वाहतुक विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता तत्परता आणि माणुसकीचे दर्शन घडवत एका नेपाळी अनाथ मुलीला सुरक्षित आसरा मिळवून दिला. व्हीआयपी बंदोबस्त राज्यपाल व मंत्र्यांच्या दौऱ्याची धावपळ व प्रशासकीय कामकाजाच्या व्यापातही वाकड वाहतूक पोलिसांनी दाखवलेली माणुसकी सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे. काल (29 मे) भुजबळ चौक पुलाखालील वाकड वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर सकाळपासून एक परप्रांतीय मुलगी रडत बसलेली असल्याचे ठाणे अंमलदार पोलीस हवालदार रोहिदास बोऱ्हाडे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तिची चौकशी केली असता तिने आपले नाव सुनिता ईश्वर सिंग बोहरा (रा. नेपाळ) असे सांगितले. एका महिलेने घर कामासाठी तिला बेंगलोर येथे आणले होते, मात्र मेहनताना मागितल्यावर संबंधित महिलेने तिला धमकावून वाकड परिसरात बेवारस सोडून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
पोलीस हवालदार रोहिदास बोऱ्हाडे यांनी तिला धीर देत चहा नाश्त्याची व्यवस्था केली व तात्काळ पोलीस कंट्रोल रूमला याची माहिती देऊन वाकड पोस्टे दामिनी मार्शल ला पाचारण केले. मुलीकडील ओळखपत्राच्या आधारे तिच्या कोल्हापूर येथील नातेवाईकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदत उभी करून मुलीच्या प्रवासाची व्यवस्था केली. तिच्या नातेवाईकांशी संपर्क करून तिला बस मधून सुरक्षितपणे कोल्हापूरला रवाना करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक, हवालदार रोहिदास बोऱ्हाडे, मपोशी वैशाली लोंढे, पोहवा बापू पोटे तसेच वाकड पोस्टे दामिनी मार्शल यांनी केलेले हे सांघिक कार्य म्हणजे खऱ्या अर्थाने "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय"या ब्रीद वाक्याचे जिवंत उदाहरण ठरले आहे. या मानवतावादी कार्याबद्दल पोलीस दलावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
