Breaking Ticker

“पत्रकारावर प्राणघातक हल्ला; आरोपी अजूनही मोकाट — लोकशाहीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह!




प्रतिनिधी - सुमेध दामधर 


     संग्रामपूर :- लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर पुन्हा एकदा निर्घृण हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २२ डिसेंबर २०२५ हा दिवस संग्रामपूर तालुक्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण लोकशाहीसाठी काळा दिवस ठरला. सत्य मांडण्याचे धाडस करणारे दैनिक सेवाशक्तीचे उपसंपादक व समाजसेवक शेख कदीर शेख दस्तगीर (वय ४२) यांच्यावर अज्ञात तिघा इसमांनी प्राणघातक हल्ला केला. सुदैवाने ते बचावले, मात्र त्यांच्या उजव्या हाताला गंभीर फ्रॅक्चर झाले असून आजही त्यांच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

         मिळालेल्या माहितीनुसार, शेख कदीर यांनी २२ जुलै २०२५ रोजी संग्रामपूर पुरवठा विभागातील कथित गैरव्यवहार व भ्रष्टाचार प्रकरणी जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना २२ डिसेंबर रोजी दुपारी तामगाव पोलीस स्टेशन येथे चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र संबंधित बीटमलदार थेट तहसील कार्यालयात गेल्याचे समोर आल्याने पुढे नेमके काय घडले याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्याच दिवशी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास, संग्रामपूरहून वरवट बकालकडे दुचाकीने जात असताना मधुकर बकाल यांच्या शेताजवळील हनुमान मंदिर परिसरात काळ्या रंगाच्या विना क्रमांकाच्या पल्सरवरून आलेल्या तिघांनी “ओ पत्रकार” अशी हाक मारून त्यांना थांबवले. पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोलीस का पाठवले, असा जाब विचारत शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी एका आरोपीने फावड्याने वार केला. डोक्यावर होणारा घाव हातावर घेतल्याने त्यांचा जीव वाचला, पण मनगट व बोटांना गंभीर दुखापत झाली.

      हल्ल्यानंतर आरडाओरड होताच आरोपी जंगल रस्त्याने फरार झाले. विशेष म्हणजे घटनास्थळी एकही सीसीटीव्ही नसल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या आहेत. दुखापतीनंतर शेख कदीर यांनी वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले आणि पुढील उपचारासाठी त्यांना शेगाव सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले, जिथे एक्स-रे व सीटी स्कॅन करून उपचार करण्यात आले. या प्रकरणी २१ जानेवारी २०२६ रोजी तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम 118(1), 352, 351(2) व 3(5) अन्वये गुन्हा नोंदवून पंचनामा व बयान घेतले आहेत. तरीही घटनेला अनेक आठवडे उलटूनही हल्लेखोर अद्याप मोकाट असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.