विविध कारणांसाठी खरेदी करण्यात येणारे १०० आणि ५०० रुपयांचे मुद्रांक खरेदी करण्याासाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची अट अखेर प्रखर विरोधानंतर मागे घेण्यात आली. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी हे आदेश गुरुवारी प्रसृत केले. पहिल्या टप्प्यात हा निर्णय केवळ मुंबईपुरताच लागू करण्यात आला होता.
पूर्वी मुद्रांक खरेदी ही अर्जदाराच्या वतीने नातेवाईक किंवा मित्र कोणीही करू शकत होते. मात्र, १ एप्रिलनंतर ज्यांना मुद्रांक खरेदी करायचे आहेत, त्यांना प्रत्यक्ष खरेदी वेळी हजर राहावे असे आदेश अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक सतीश देशमुख यांनी प्रसृत केले होते. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ३ एप्रिलपासून सुरू झाली. मात्र, या निर्णयाला वकिलांच्या संघटनेने विरोध केला आणि खरेदीवर बहिष्कारही घातला होता. त्यामुळे ३ एप्रिलला मुंबईत मुद्रांक खरेदी झाली नाही. या निर्णयावरून नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. या निर्णयामुळे मुद्रांक खरेदी करताना विक्रेत्यांना अडचणी येत होत्या. खरेदीदारांची गैरसोय होऊ लागली होती. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिक विकलांग नागरिकांना मुद्रांक खरेदीसाठी कसरत करावी लागणार होती. या नागरिकांना स्वत: मुद्रांक खरेदीसाठी जावे लागणार होते. याची तातडीने दखल घेत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच हस्ते पद्धतीने मुद्राक खरेदी विक्री होणार आहे.
.jpg)