मलकापूर कंत्राटी नोकरीसाठी अमिष दाखवून मुंबईच्या इसमाने मलकापूर तालुक्यातील २५ जणांना गंडविले. मंत्रालयात सहाय्यक प्रशासन अधिकारी म्हणून तालुक्यात बावरलेल्या तोतया अधिकाऱ्याने सुमारे साडेपाच लाखांचा गंडा घातल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून एमआयडीसी पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे...
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, दिपेश मंगल भोईर रा. शेळगांव पो. दाभाड ता. भिवंडी जि.ठाणे (मुंबई) हा डिसेंबर महिन्यात मलकापूर तालुक्यात आला होता. एका ठिकाणी खाजगी कार्यक्रमात उपस्थित राहून त्याने मंत्रालयात सहाय्यक प्रशासन अधिकारी असल्याची बतावणी केली. त्याची एक नव्हे अनेक जणांना भुरळ पडली. त्याच कालावधीत तोतया अधिकाऱ्याने उमाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली व शेरा देखील मारला. सही शिक्क्यानिशी औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आरोग्य निरीक्षक विष्णू हुंबड यांचा त्याच्यावर विश्वास बसला. अन् मग काय एकापाठोपाठ एक अशा एक नव्हे २५ जणांनी कंत्राटी का होईना नोकरी मिळते म्हणून त्याच्यावर विश्वास टाकला.त्याने विष्णू हुंबड यांच्या माध्यमातून वाहन चालक, डाटा एन्ट्री आपरेटर, लिपिक, परीचारक, आरोग्य सेविका, औषध निर्माता या पदासाठी संबंधीत उमेदवारांकडून प्रत्येकी २० हजाराची अट घातली. या व्यवहारात फोन पे वर ४ लाख १८०० व रोख रक्कम १ लाख ३९ हजार असे एकूण ५ लाख ३९ हजार २०० व इतर पैसे असे सुमारे साडेपाच लाखांचा गंडा घातला.
अर्थात याप्रकरणी दिपेश भोईर याने एका नियुक्तीची फेक आर्डर देखील पाठवली होती. पण इतरांची कामे थकल्यावर या प्रकरणाचा बोभाटा झाला. त्यात एप्रिलपर्यंत इतरांच्या आर्डर आल्या नाहीत. तर दुसरीकडे संबंधीत व्यक्तीचा फोन बंद म्हटल्यावर अन्यायग्रस्तांनी अखेर २३ जून रोजी एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोग्य निरीक्षक विष्णू जनार्दन हुंबड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिपेश मंगल भोईर याच्या विरुध्द अपराध नं. ८२/२३ कलम ४२०, ४१७, ४१९, ४६५, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलिस निरीक्षक दुर्गेश राजपूत करीत आहेत
