Breaking Ticker

दुचाकी मागे घे म्हटल्याने 'इगो' दुखावला; दोन गोळ्या झाडल्या

  


कमानी हौद परिसरात राडा; सहाजणांवर गुन्हा दाखल

सातारा : येथील कमानी हौद परिसरात गुरुवारी मध्यरात्री दुचाकी मागे घेण्यावरून वाद झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. यानंतर एका तरुणाने दुचाकीस्वाराच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. मात्र, सुदैवाने या गोळ्या संबंधित तरुणाला लागल्या नसून, यात तो बालंबाल बचावला. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धीरज ढाणे (रा. मंगळवार पेठ, सातारा), हर्शद शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा) यांच्यासह चार अनोळखींचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील कमानी हौदाजवळ गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हर्षद शेख हा काही तरुणांसोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी त्याने त्याची दुचाकी रस्त्यात आडवी उभी केली होती. विशाल अनिल वायदंडे (वय २७, रा. शनिवार पेठ, सातारा) हा दचाकीवरून तेथून जात होता. त्यावेळी त्याने हर्षदला दुचाकी बाजूला घे, असे सांगितले. तेव्हा त्याने 'घेणार नाही, तुला काय करायचे तर कर,' असे म्हटल्यानंतर विशालने त्याची दुचाकी दुसऱ्या बाजूने रस्त्याच्या कडेने काढली व तो तेथून निघून गेला. पानटपरीजवळ ठेवलेला मावा घेऊन तो परत तेथून जात असताना हर्षदने त्याला थांबवले. 'थांब, तला दाखवतो,' असे म्हणत त्याने धीरज ढाणे याला फोन केला. काही वेळातच ढाणे त्याच्या काही मित्रांना घेऊन तेथे आला. त्याने विशाल याला मारहाण करण्यास सुरुवात केली. विशालसोबत असलेला त्याचा मित्र विक्रम यादव हा वाद सोडवत असताना त्यालाही मारहाण करण्यात आली. विक्रमने 'तू पळून जा,' असे म्हणत विशालला ढकलले. त्यानंतर विशाल पळून जात असताना धीरज ढाणे याने त्याच्याकडील पिस्तुलामधून दोन गोळ्या त्याच्या दिशेने झाडल्या. मात्र, सुदैवाने त्या गोळ्या विशालला लागल्या नाहीत. अंधारात एका घराच्या आडोशाला विशाल लपून बसला. रात्रीचा दंगा ऐकून आजूबाजूचे नागरिक जमा झाले. हे दिसताच धीरज ढाणे, हर्षद शेख व त्याचे इतर साथीदार तेथून पसार झाले.

विशाल वायदंडे याने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी हर्षद शेख, धीरज ढाणे यांच्यासह सहाजणांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.

आरोपींच्या शोधासाठी पथक तैनात

सातारा शहरात गोळीबाराची घटना घडल्याचे समजताच प्रचंड खळबळ उडाली. सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे पथक आरोपीच्या शोधासाठी तैनात करण्यात आले असून, लवकरच संबंधित आरोपीच्या मुसक्या आवळल्या जातील, असे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.