मलकापूर तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्हा, अकोला, जळगाव, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापसाच्या अधिकच्या भावाचे आमिष दाखवित त्यांचा कापूस खरेदी करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या जगन रामचंद्र नारखेडे (जग्गु) व त्याच्या साथीदारांविरोधात प्राप्त झालेल्या तक्रारींविरून पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांनी आयोजित पत्रकार परिषदेत २ फेब्रुवारी रोजी दिली.
मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी, एसआयटीचे पडोळे, मलकापूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्रीधर गुड्ढे यांचेसह आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी माहिती देतांना जिपोअ, सुनिल कडासने यांनी सांगितले की, ३०/११/२०२३ रोजी फिर्यादी नामे अतुल मधुकर पाटील (वय ४२ वर्षे) धंदा शेती रा. कुंड बुर्दुक ता. मलकापूर यांनी तोंडी रीपोर्ट दिला होता.
त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, माझा व माझे गावातील लोकांचा मिळून २४७ क्विंटल १९ किलो कापूस ज्यावेळी बाजारभाव ७५०० रु. ते ७८०० रु. असतांना बाजार भावापेक्षा जास्त भाव म्हणजेच प्रती क्विटल ९००० रु. प्रमाणे देण्याचे अमिष दाखवून एकूण २२ लाख २४ हजार ७१० रु. चा कापूस जग्गु रामचंद्र नारखेडे रा. भालेगाव ता. मलकापुर व गावातील राजेंद्र पांडुरंग पाटील रा. कुंड बु. ता. मलकापूर व राजेंद्र पाटील यांचा साला नामे शरद विष्णु बोरले रा. भालेगाव ता. मलकापूर यांनी संगणमताने खरेदी करुन त्यापैकी फक्त १ लाख ६६ हजार ६५० रु. दिले. बाकीचे माझे व गावातील लोकांचे असे सर्व मिळून कापसाचे राहीलेले २० लाख ५८ हजार ६० रु. दिले नाही. वरील तिघांनी मिळुन माझी व गावातील लोकांची कापूस खरेदी करुन त्याचे पैसे न देता आर्थिक फसवणुक केली आहे. अशा फिर्यादीचे रीपोर्ट वरुन तिघांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला.
सदर गुन्हयाचा प्राथमीक तपास पो.उप.नि. रोकडे यांनी केला असून त्यांनी सदर गुन्हयाचे तपासात यापुर्वी आरोपी राजेंद्र पांडुरंग पाटील व शरद विष्णु बोरले यांना अटक करुन व नंतर मुख्य आरोपी जगन नारखेडे राजेश पांडूरंग पाटील यांना अटक करुन पोलीस कस्टडी रिमांड घेवून तपास केला. सदर गुन्हयाचे तपासात गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन तसेच सदरचा गुन्हा आर्थिक गुंतागुतीचा असल्याने सदर प्रकरणाचा तपास २४ डिसेंबर रोजी विशेष पथक (SIT) स्थापन करून सोपविण्यात आला. त्यांच्याकडे या प्रकरणात आतापर्यंत आरोपी जगन ऊर्फ जग्गु रामचंद्र नारखेडे (वय ४३ वर्षे) रा. भालेगाव, राजेश पांडुरंग पाटील (वय ५४ वर्षे) रा. कुंड बु., शरद विष्णु बोरले (वय ४९ वर्षे) रा. भालेगाव, पृथ्वीराज रघुनाथ तायडे (वय २२ वर्षे) रा. भालेगाव, भगवान बाबन घुले (वय ३३ वर्षे) चरा. भालेगाव, वैभव निनाजी घुले (वय २१ वर्षे) रा. भालेगाव, विनायक नामदेव गारमोडे (वय ४५ ■वर्षे) रा. भालेगाव, गोपाल रविद्र घुले (वय २५ वर्षे) रा. भालेगाव यांना अटक करण्यात आली असून सद्या ते न्यायलयीन कस्टडीमध्ये आहेत. तर नारायण यादव वराडे (वय ६२ वर्षे) रा. भालेगांव ता. मलकापूर यास आज अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्यात आले.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून आधीच अनेक विविध संकटांनी त्रस्त आहे. शेती कसून आलेला पैसा हा शेतकऱ्यांसाठी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घामा, कष्टाचा पैसा लुटणाऱ्या जगन नारखेडेसह सर्वच आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येऊन शेतकऱ्यांना त्यांचा पैसा परत मिळवून देणे हेच ध्येय ठेऊन आम्ही काम करीत आहोत. - सुनिल कडासने, जिल्हा पोलीस अधिक्षक, बुलढाणा
आतापर्यंत तपासात हस्तगत मुद्देमाल
• संशयीत तीन नकली नोटा छापण्याच्या मशीन किंमती २० लाख रूपये.
• दोन चारचाकी मोटार कार वाहन किंमती - ४१ लाख रूपये.
• दोन मोबाईल व एक टॅब १ लाख २५ हजार रूपये.
• रोख रक्कम १९ लाख रूपये, ▶ एक ई बाईक किंमत अं.६० हजार रूपये.
• असा एकुण ८९ लाख ८५ हजार रूपयांचा मुददेमाल.
