वन विभागाच्या अटींसह शिवभक्तांना दर्शनाची संधी !!
प्रतिनिधी
अकोट : सातपुड्याच्या कुशीत वसलेले श्री क्षेत्र धारगड येथील पुरातन शिवमंदिर १५ फेब्रुवारी ला महाशिवरात्री निमित्त सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिवभक्तांसाठी दर्शनाकरिता खुले राहणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी वन विभागाने निर्धारित केलेल्या अटी-शर्ती व वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन श्री क्षेत्र धारगड सेवा समिती, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल अकोट प्रखंड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिवभक्तांना धारगड टी-पॉइंटपर्यंत चारचाकी वाहन (कार) घेऊन जाण्याची परवानगी राहील. तेथून श्री क्षेत्र धारगड मंदिरापर्यंत सुमारे एक किलोमीटर अंतर निसर्गरम्य वातावरणातून पायदळ जावे लागणार आहे. दुचाकी वाहनांना खटकाली गेटपर्यंत परवानगी असेल. खटकाली गेटपासून भाविकांसाठी वन विभागाच्या वतीने वाहनसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. धारगड टी-पॉइंट येथे श्री क्षेत्र धारगड सेवा समिती, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने भाविकांसाठी फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवभक्तांनी दर्शनासाठी येताना प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, ज्वलनशील पदार्थ, धारदार शस्त्रे आदी वस्तू आणू नयेत, तसेच सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
