सुमेध दामधर संग्रामपूर प्रतिनिधी
संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथे 23 फेब्रुवारी रोजी “ग्रामस्वच्छता अभियान” राबवत राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात स्वच्छतेचा आणि समाजप्रबोधनाचा संदेश घुमला. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी दिलेला “स्वच्छता हीच खरी ईश्वरसेवा” हा मूलमंत्र अंगीकारत आयुष्यभर खराटा हातात घेऊन त्यांनी स्वच्छतेची ज्योत प्रज्वलित केली. शिक्षण, स्वच्छता आणि व्यसनमुक्ती हा त्यांचा जीवनमंत्र आजही तितकाच प्रेरणादायी ठरत आहे. कीर्तन व समाजप्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी मोलाचे कार्य केले. सरपंच सौ. सीमाताई राजेंद्र वानखडे यांच्या संकल्पनेतून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 19 फेब्रुवारी शिवजयंती ते संत गाडगेबाबा जयंती या कालावधीत ग्राम टुनकी येथे विविध सामाजिक उपक्रमांसह ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी 10 वाजता ग्रामसेवक, सदस्य, कर्मचारी व मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंचांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर माय बेस्ट फ्रेंड अँड ओल्ड फ्रेंड ग्रुपच्या वतीने गाडगेबाबांच्या वेशभूषेत आलेल्या सदस्यांनी ग्रामस्वच्छता अभियानाला प्रारंभ केला. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलन तसेच गावातील विविध ठिकाणी टँकरद्वारे पाण्याचा शिरकावा करण्यात आला. दुपारी 4 वाजता बस स्थानक चौकातून अभियानाची सुरुवात झाली. टुनकी, लाडणापूर व वसाडी येथील फ्रेंड ग्रुपचे सदस्य, शाळकरी विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महिलांनी घरासमोर सुंदर रांगोळ्या काढून उपक्रमाला रंगत आणली. ठिकठिकाणी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयघोष करण्यात आला. सुरजीत सिंग बाबर व प्रदीप झाल्टे यांनी साकारलेला संत गाडगे महाराजांचा जिवंत देखावा विशेष आकर्षण ठरला. संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबवल्यानंतर रात्री 8 वाजता जिल्हा परिषद शाळेजवळील संत गाडगे महाराज स्मारकाजवळ दीपप्रज्वलन, पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. या उपक्रमामुळे टुनकी ग्रामपंचायत व माय बेस्ट फ्रेंड अँड ओल्ड फ्रेंड ग्रुपच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून ग्रामस्वच्छतेचा आदर्श निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
