Breaking Ticker

पालक–मुलांतील दुरावा कमी करण्यासाठी व नातेसंबंध दृढ करण्याचा प्रेरणादायी उपक्रम



“आई-बाप सन्मान चेतना” – बदलत्या काळात नात्यांना नवी दिशा देणारे हृदयस्पर्शी व्याख्यान संपन्न

तालुका  प्रतिनिधी सुमेध दामधर

संग्रामपूर (०५ फेब्रुवारी):-  आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानप्रधान युगात आई-वडील व मुलांमधील संवाद कमी होत चालला असून, नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर “आई-बाप सन्मान चेतना” या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि समाजप्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले संत नगरी सोनाळा येथे करण्यात आले. या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक, युवा व्याख्याते, समाजपरिवर्तनकार व राष्ट्रीय-राज्यस्तरीय पुरस्कार विजेते वसंत हंकारे सर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या ओघवत्या व प्रभावी शैलीतून आई-वडिलांचे महत्त्व, पालकांचे कष्ट, तसेच बदलत्या काळात मुलांनी कसे समजूतदारपणे वागावे यावर सखोल विचार मांडले. आई-वडील आणि मुलांमधील संवाद कसा वाढवावा, पिढ्यांमधील विचारभिन्नता कशी समजून घ्यावी, पालकांचा सन्मान राखत आधुनिक विचारसरणी कशी जपावी यावर उपस्थितांना आत्मपरीक्षण करायला लावणारे विचार मांडण्यात आले. अनेक उपस्थितांच्या डोळ्यांत भावनांचे अश्रू तर काहींच्या मनात नवे संकल्प दिसून आले. 

हा कार्यक्रम समस्त गावकरी मंडळी, सोनाळा व पोलिस स्टेशन सोनाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास नागरिक, पालक, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे संग्रामपूर तालुक्यातून बऱ्याचशा गावातून जसे टुणकी, बावन्नवीर, सायखेळ व सौंदळा अशा गावातून विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. आई-वडील म्हणजे आयुष्याचा पाया असून, त्यांचा सन्मान राखणे ही केवळ जबाबदारी नाही तर संस्कारांची ओळख आहे, असा ठाम संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. यावेळी गावागावातून महिला मंडळ ज्येष्ठ श्रेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, विद्यार्थी विद्यार्थिनी, पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री संदीप काळे साहेबांसह सर्व कर्मचारी,प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, ग्रामपंचायत श्री हर्षल खंडेलवाल सरपंचासह संपूर्ण टीम प्रामुख्याने हजर होते. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक कन्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सतीश भाऊ वानखडे यांनी सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाच्या वतीने जमलेल्या अथांग महासागराचे उपस्थित मान्यवरांचे पोलीस प्रशासनाचे आरोग्य विभागाचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.