शहादा प्रतिनिधी :
शहादा नगरीतील धर्मप्रेमी वातावरणात श्री सच्चियाय माता (ओसिया) सेवक संघ, शहादा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली “विशाल जागरण संध्या – एक शाम माँ सच्चियाय (ओसिया) के नाम” ही भव्य भक्तिसंध्या अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात मोठ्या दिमाखात संपन्न झाली.
दि. 24 मार्च 2026, मंगळवार रोजी लुंकड़ निवास, कुलकर्णी हॉस्पिटलजवळ, डोंगरगाव रोड, शहादा येथे आयोजित या भव्य कार्यक्रमास लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत महिला-पुरुष, युवक-युवती, मातृशक्ती तसेच संपूर्ण परिवार व इष्टमित्रांसह मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. संपूर्ण परिसर “जय सच्चियाय माता” च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत श्रद्धाभावाने करण्यात आली. यावेळी सूरत येथील सुप्रसिद्ध भजन गायक श्री निलेशजी बाफना यांनी आपल्या मधुर, ओजस्वी आणि भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या भजनांनी उपस्थित भक्तगणांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सुमधुर सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले असून उपस्थित भाविकांनी रात्री उशिरापर्यंत भजनांचा मनसोक्त आनंद घेतला.कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेली महा आरती मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी 51 सह जोड्यांनी महाआरतीचा लाभ घेतला, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली. आरतीवेळी निर्माण झालेला आध्यात्मिक आणि अलौकिक अनुभव प्रत्येक भक्ताच्या मनात भक्तिभाव जागवणारा ठरला.
मातेच्या परंपरेनुसार महिलांनी लाल चुंदडी साडी, तर पुरुषांनी पांढरा कुर्ता-पायजमा परिधान करून कार्यक्रमास उपस्थित राहून भक्ती, शिस्त आणि परंपरेचे सुंदर दर्शन घडवले. संपूर्ण कार्यक्रमात भक्तांनी अत्यंत श्रद्धा, शिस्त आणि उत्साहाने सहभाग नोंदवला.
या भव्य भक्तिसोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री सच्चियाय माता (ओसिया) सेवक संघ, शहादा तसेच सर्व सेवाभावी कार्यकर्ते, पदाधिकारी, सहकार्य करणारे कुटुंबीय व धर्मप्रेमी समाजबांधव यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.शेवटी उपस्थित भक्तांनी अशा प्रकारचे धार्मिक, सांस्कृतिक आणि समाज एकत्रित करणारे कार्यक्रम भविष्यातही सतत आयोजित व्हावेत, अशी भावना व्यक्त केली.
