कर्मचाऱ्यांचा इशारा – मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच
संग्रामपूर प्रतिनिधी सुमेध दामधर
ग्रामपंचायतीतील रिक्त पदे तात्काळ भरावीत तसेच प्रलंबित मागण्यांकडे लक्ष द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी सोनाळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण दिनांक 4 मार्च 2026 रोज बुधवार ला सुरू केले आहे. प्रशासनाकडून वारंवार निवेदन देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. सोनाळा ग्रामपंचायतीत वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक यांसारखी महत्त्वाची पदे अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत आहे. यामुळे नागरिकांना विविध कामांसाठी वारंवार ग्रामपंचायत कार्यालयाचे चकरा माराव्या लागत असून मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली असून अखेर त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून सेवा बजावत असलेल्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी पदांवर संधी देण्यात यावी, तसेच रिक्त पदे तात्काळ भरावीत अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे. या उपोषणात राजेश उमाळे, गोविंदा देशमुख, देवासिंग कचवार, शेख आशिक, शंकर कांडेलकर, आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग असून “मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू,” असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी सोनाळा ग्रामपंचायत समोर एकाच वेळी दोन उपोषणाचे पेंडॉल टाकलेले आहे. एक उपोषण पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या असून दुसरे उपोषण ग्रामपंचायत मध्ये काम करणारे दिव्यांग शरद लव्हाळे यांचे आहे. यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न बजावता त्यांना त्यांच्या पदावरून कमी करण्यात आले आहे. असे त्यांचे म्हणणे आहे त्यांना पूर्वीप्रमाणे कामावर रुजू करून घ्यावे यासाठी त्यांनी उपोषण सुरू केले आहे. सध्या या आंदोलनाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
