Breaking Ticker

खासगी शाळांना दिलेल्या नगरपरिषदेच्या इमारती पुन्हा ताब्यात घ्या; खुलताबादमध्ये अत्याधुनिक नगरपरिषद शाळा सुरू करण्याची मागणी



मुनीर अब्बास शाह बाजार सावंगी

खुलताबाद नगरपरिषदेच्या मालकीच्या शाळा इमारती खासगी शाळांना भाडे तत्वावर देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्या इमारती पुन्हा नगरपरिषदेच्या ताब्यात घेऊन विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते इकबाल पटेल यांनी सोमवारी (दि. १८) नगरपरिषद मुख्याधिकारी समीर शेख आणि नगराध्यक्ष सय्यद आमेर पटेल यांना निवेदनाद्वारे केली. शहरातील गरीब, सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

निवेदनानुसार, आझमशाही पुरा, हवालदार वाडा तसेच कमला नेहरू शाळा परिसरातील नगरपरिषदेच्या मालकीच्या शाळा इमारती सार्वजनिक शिक्षणासाठी उभारण्यात आल्या होत्या. मात्र सध्या या इमारती खासगी शाळांना भाडे तत्वावर देण्यात आल्याची बाब समोर येत असून, नगरपरिषदेने या इमारती पुन्हा स्वतःच्या ताब्यात घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी वापराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

इकबाल पटेल यांनी नगरपरिषदेकडे या शाळांमध्ये डिजिटल वर्गखोल्या, संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडा सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण सुविधा उपलब्ध करून नगरपरिषदेच्या आदर्श शाळा विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. शहरातील सर्व समाजघटकांचा विचार करून मराठी, उर्दू आणि इतर माध्यमांत दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी भर दिला आहे.

गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत आधुनिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच कौशल्य विकासाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नगरपरिषद प्रशासनाने संबंधित शाळा इमारतींची संयुक्त पाहणी करून आवश्यक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.