मिलिंद खरात.वाडा.प्रतिनिधी.
👉 मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटेनेच्या नेतृत्वाखाली मुंबई , ठाणे ,पालघर , रायगड जिल्वह्यातील सुमारे 200 शिक्षकांनी आज आझाद मैदानात आंदोलन करून सुधारित संचमान्यतेच्या मसुद्याची प्रतिकात्मक होळी केली व संचमान्यतेच्या मसुद्याच्या प्रती फाडून टाकल्या व अशा संचमान्यता आम्ही स्वीकारणार नाही असे जाहीर केले.
त्यानंतर याबाबतचे निवेदन मुंबईचे उपसंचालक श्री. राजेश कंकाळ यांनी स्वीकारले व सदर निवेदन शिक्षण संचालक यांच्याकडे पाठवण्यात येईल असे सांगितले. व त्याच्या प्रती मान. शिक्षण मंत्री , मान. शिक्षण प्रधान सचिव , शिक्षण आयुक्त यांच्या कडे पाठवल्या जातील. सदर आंदोलनप्रसंगी महासघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर , मुंबई विभागीय अध्यक्ष प्रा. श्रीप्रकाश दीक्षित , मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रा. अमर सिंह , महासंघ उपाध्यक्ष प्रा. रवींद्र भदाने , महासंघाचे माजी उपाध्यक्ष व पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा. सुनील पूर्णपात्रे , ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रा. सुरेश अहिरे , रायगड जिल्हा अध्यक्ष प्रा. भानुदास बिरादार यांनी शिक्षकांना संबोधित केले.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी यावर्षी ऑनलाईन संचमान्यता करण्यात येणार असल्याने व त्यासाठी विद्यार्थी तसेच शिक्षकांचे नुकसान करणारे निकष लागू केले जात असल्याने महाराष्ट्रात सर्वत्र असंतोष निर्माण झाला आहे. राज्यात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकानी दिनांक १ जून २०२६ रोजी सर्वत्र उपसंचालक कार्यालयासमोर या सुधारित ऑनलाईन संचमान्यता निकषांच्या मसुद्याची होळी केली. या ऑनलाइन संच मान्यतेतील घातक सुधारित निकष रद्द करावेत व प्रचलित निकषानेच संच मान्यता देण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.. संघटनेने काही घातक निकष पुढीलप्रमाणे कळवले आहेत.
👉 १) नियमानुसार प्रत्येक पूर्णवेळ शिक्षकाला आठवड्याला १७ घड्याळी तास कार्यभार असावा. परंतु सुधारित ऑनलाईन संचमान्यतेत १७ तास २० मिनिटे कार्यभार दिला आहे. त्यामुळे राज्यात पन्नास हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक असतील तर त्यापैकी एक हजार शिक्षक संख्या कमी होते. कित्येक महाविद्यालयात पूर्णवेळ शिक्षक अर्धवेळ, सी एच बी होतात. त्याचप्रमाणे अर्धवेळसाठी ८.३० ऐवजी ८.४० ते १२ तास लागू केले.
👉 २) आदिवासी डोंगराळ भागात ३० विद्यार्थ्यांना एक तुकडी मंजूर होते त्याऐवजी ५० विद्यार्थ्यांना एक तुकडी मंजूर केली आहे. त्यामुळे ३० पेक्षा जास्त पण ५० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या कित्येक कनिष्ठ महाविद्यालयात एकही तुकडी मंजूर नाही. त्या कॉलेज मध्ये एकही शिक्षक मंजूर होत नाही व तेथील विद्यार्थ्यांना शिकायला मिळणार नाही. शिक्षक कमी झाले.
👉 ३) एखाद्या तुकडीत १५ मुली शिकत असतील तर त्यांना अनुदान मंजूर होत असे, आता सुधारित ऑनलाईन संचमान्यतेत ती सुविधा ठेवली नाही त्यामुळे अशा ठिकाणच्या मुलींचे शिक्षण थांबणार आहे, शिक्षकही कमी झाले.
👉 ४) एखाद्या तुकडीत ४०/३० विद्यार्थी असतील तर त्यांना ५०००/१०००० आर्थिक दंड लावून तुकडी मंजूर केली जात असे, या सुधारित ऑनलाईन संचमान्यतेत ही सोय ठेवली नाही, त्यामुळे ती तुकडी अनुदानित राहत नाही, विद्यार्थी असे कॉलेज सोडतात. तेथील शिक्षक कमी होतात.
👉 ५) वेगवेगळ्या सत्रात चालणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकत्रित करून तुकडी व कार्यभार मंजूर केल्यामुळे तुकड्या, शिक्षक संख्या कमी होते.
👉 ६) या सुधारित ऑनलाईन संचमान्यतेत वेगवेगळ्या शाखांमधील विद्यार्थी एकत्रित केले आहेत, गणित सारख्या काही विषयांचा अभ्यासक्रम वेगळा असतो, भाषासारख्या विषयात उद्दिष्टे वेगळी असतात. त्यामुळे अध्यापन प्रक्रिया बदलते. सर्व विद्यार्थी एकत्र केल्यामुळे त्यांच्या अध्ययन क्षमता योग्य प्रकारे विकसित करता येत नाहीत..
👉 ७) राज्यातील आठ पैकी पाच विभागात वरिष्ठ महाविद्यालयांना जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात तसिकेचा कालावधी ४५ मिनिटे असून तो राज्यात सर्वत्र ४५ मिनिटांचा असावा अशी शिफारस शासनाने नेमलेल्या शिक्षण संचालकाच्या अध्यक्षतेखालील समितीने १५ वर्षापूर्वी केलेली असताना आता या ऑनलाइन संचमान्यतेत हा कालावधी ४० मिनिटाचा करण्यात आला आहे. त्यामुळे तेथील एक नवमांश शिक्षक संख्या कमी होत आहे. विद्यार्थ्यांचा अध्ययन कालावधी कमी होतो.
👉 ८) विज्ञान विषयासाठी एक प्रॅक्टीकल बॅच २० विद्यार्थ्यांसाठी होती ती आता ३० विद्यार्थी करण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करणे जिकिरीचे केले आणि शिक्षकाचा कार्यभार प्रत्येक तुकडीमागे ६ ते ८ तासिकांनी कमी झाला. विज्ञान विषयाचे राज्यात २५ ते ४० टक्के शिक्षक कमी झाले, ती संख्या राज्यात साडेचार ते पाच हजार आहे.
👉 ९) विज्ञान विषयासाठी प्रात्यक्षिके महत्वाची असल्यामुळे स्वाध्याय ऐवजी प्रात्यक्षिक घेण्याची मुभा होती. ती या ऑनलाइन संचमान्यतेत काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अनुभव कमी करून त्यांचे नुकसान केले. शिक्षकांचा प्रत्येकी १ ते ३ तासिकांचा कार्यभार कमी केला.
👉 १०) दोन विषयात पूर्ण पात्रता धारण करणाऱ्या शिक्षकांना त्या दोन्ही विषयाचा मिळून पूर्ण कार्यभार होत असल्यास अशा शिक्षकास पूर्णवेळ मान्यता मिळत असे, सुधारीत ऑनलाईन संचमान्यतेत ही सुविधा उपलब्ध नाही.
👉 ११) शारीरिक शिक्षण विषय केवळ पात्रताधारक म्हणजे एम. पी. एड. किंवा एम. ए. बी. पी. एड. धारक शिक्षकच शिकवीत असत. आता शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका इतर शिक्षकांना वाटून देण्यात आल्या व शारीरिक शिक्षण शिक्षक कमी केले असे होऊ नये. अंशतः कार्यभार उपलब्ध असल्यास व तेथे शिक्षक नसल्यास अशा तासिकांचे इतर शिक्षकांना वाटप करण्यास हरकत नाही.
👉 १२) पर्यावरण शिक्षण तासिकांचे वितरण इतर विषय शिक्षकांना कार्यभार पूर्ण होण्यासाठी देण्यात येत होते ते या ऑनलाईन संचमान्यतेत देण्यात आलेले नाही.
तसेच कनिष्ठ महाविद्यालयात शासनानेच ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेले असल्यामुळे ते सर्व विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात द्यावेत.
अशा प्रकारचे विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी घातक ठरणारे कोणतेही निकष ऑनलाइन संच मान्यतेसाठी लादण्यात येऊ नयेत. यासाठी महासंघाला आणखी तीव्र आंदोलन यापुढे करावयास भाग पाडू नये. प्रचलित निकषाप्रमाणेच संच मान्यता देण्यात याव्यात. असा इशारा शासनास देण्यात आला.
