हंडी (जिंतूर) प्रतिनिधी:
हंडी गावात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या काही महिन्यांपासून बंद पडल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याबाबत पत्रकार गणेश विठ्ठलराव पालवे यांनी ग्रामपंचायतीकडे निवेदन देऊन रखडलेले काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले काम अपूर्ण अवस्थेत थांबले असून त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन संबंधित कंत्राटदाराला तातडीने सूचना देऊन रखडलेले काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद परभणी, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती जिंतूर यांना पाठविण्यात आल्या आहेत
"पाणी हा मूलभूत हक्क; जलजीवन मिशनचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करा" अशी मागणी आता हंडी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
