Breaking Ticker

अकोला बाजार येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेची प्रभात फेरी ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू....



     सम्यक घुले प्रतिनिधी-यवतमाळ 


अकोला बाजार :- नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात संस्मरणीय व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण व्हावे, या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, अकोला बाजार येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी आगळावेगळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सजविलेल्या पारंपरिक बैलगाडीतून विद्यार्थ्यांची गावातून भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. या उपक्रमाने संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे,चला शाळेत जाऊया, उज्ज्वल भविष्य घडवूया अशा घोषणा देत शिक्षणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविले. शिक्षणाचे महत्त्व, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेची गरज, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नियमित शाळेत उपस्थिती याविषयी जनजागृती करणाऱ्या घोषणा दिल्या.शाळेचे मुख्याध्यापक राधेश्याम चेले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समिती चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.  शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत ज्ञान, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा निर्धार करण्याचे आवाहन केले.ग्रामीण संस्कृतीची ओळख जपत पारंपरिक बैलगाडीच्या माध्यमातून काढण्यात आलेली ही प्रभात फेरी विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरली. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्याचा हा प्रयत्न पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात कौतुकास पात्र ठरला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण होण्यासोबतच शाळा आणि समाज यांच्यातील नाते अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली....


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.