पट्टण कोडोली ग्रामपंचायतीच्या कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा
रोहिदास चौक राधा कृष्ण मंदिर समोर कचरा भरलेली ट्रॉली कचरा भरून उलटली; जोडलेला ट्रॅक्टर चार दिवसांपासून पंचर अवस्थेत पट्टण कोडोली : येथील ग्रामपंचायतीच्या कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कचरा वाहतूक करणारी ट्रॉली कचरा भरून उलटून पडली असून, त्याला जोडलेला ट्रॅक्टर गेल्या चार दिवसांपासून पंचर अवस्थेत त्याच ठिकाणी उभा आहे. त्यामुळे परिसरातील कचरा व्यवस्थापनाच्या कामावर परिणाम होत असून, नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत. आहे. ग्रामपंचायतीकडून गावातील कचरा संकलित करून त्याची वाहतूक करण्यासाठी या ट्रॅक्टर-ट्रॉलीचा वापर केला जातो. मात्र, कचरा भरलेली ट्रॉली उलटून पडल्यानंतर ट्रॅक्टरही पंचर अवस्थेत गेल्या चार दिवसांपासून जागेवरच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कचरा उचलण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.गावातील स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने कचरा व्यवस्थापन ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अशा परिस्थितीत बंद पडलेले वाहन तातडीने दुरुस्त करून कचरा वाहतूक सुरळीत करावी, तसेच उलटलेली ट्रॉली हटवून परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.ग्रामपंचायतीने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा सुरळीत करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

