Breaking Ticker

विदर्भ वगळता शाळा १५ जूनपासून, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा


 मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये आणि त्यांना सुटय़ांचे नियोजन करता यावे यासाठी या वर्षीपासून दरवर्षी राज्य मंडळाच्या शाळा १५ जून रोजी सुरू होतील. तर विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी दिली.

१५ जूनला रविवार किंवा सुट्टी असेल तर त्याच्या पुढच्या दिवशी शाळा सुरू होईल असेही त्यांनी सांगितले. शाळेत दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत या वर्षीदेखील मुलाच्या शाळेतील प्रवेशाचे स्वागत केले जाणार आहे. शाळापूर्व तयारीचा पहिला मेळावा २६ एप्रिल पासून आणि दुसरा मेळावा जून महिन्यात घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारचा नव भारत साक्षरता कार्यक्रम राज्यातही राबविला जाणार आहे. यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. या वर्षीपासून शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश तसेच वह्या, बूट आणि सॉक्स सरकारतर्फे दिले जाणार आहेत. पुस्तकांमध्ये प्रत्येक धडय़ानंतर टिपण (नोटस्) काढण्यासाठी आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच इयत्ता बारावीच्या परीक्षा पुढील वर्षी होणार नाहीत हे खरे नसून पालक आणि विद्यार्थ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

                राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षण

    येत्या वर्षांपासून शाळांमध्ये ‘आजी-आजोबा दिवस’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे केसरकर यांनी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. राज्यातील अघोषित व घोषित विनाअनुदानित शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्याचा तसेच त्रुटीपूर्ततेनंतर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या अघोषित शाळांना नैसर्गिक तुकडय़ांना सरसकट २० टक्के अनुदानासाठी पात्र घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी निधीदेखील मंजूर करण्यात आला आहे. शिक्षक व सेवकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली असून शिष्यवृत्तीच्या रकमेतदेखील मोठी वाढ करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.