संग्रामपूर प्रतिनिधी - श्री सुमेध दामधर
संग्रामपूर (०८ फेब्रुवारी २०२६) :तालुक्यात त्याग, संघर्ष व ममतेचे प्रतीक असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची 128 वी जयंती मोठ्या उत्साहात व सामाजिक एकतेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. तालुक्यातील सोनाळा, तुणकी, वरवट बकाल, जस्तगाव, संग्रामपूर तसेच बावनबीर या सर्व प्रमुख ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा, महिला संघटना, वंचित बहुजन आघाडी व विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने जयंती उत्सव आयोजित करण्यात आला. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण–पंचशील घेऊन करण्यात आली. माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या त्यागमय जीवनाला अभिवादन करण्यात आले. अनेक ठिकाणी गीतगायन, भजन, समाजप्रबोधनपर भाषणे, विचारमंथन व भव्य मिरवणुक सोहळ्याचे कार्यक्रम पार पडले. बावनबीर येथे भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा महिला यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गायिका छायाताई बोदडे यांनी माता रमाई यांच्या जीवनकार्यावर आधारित भावस्पर्शी गीतांचे सादरीकरण केले. तालुक्यातील विविध कार्यक्रमांना वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष, युवा अध्यक्ष तसेच वंचित बहुजन महिला आघाडी, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संस्कार सचिव, संग्रामपूर तालुका प्रभारी, तालुका कोषाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा महिला तालुकाध्यक्ष, यांच्यासह बौद्ध उपासक-उपासिका, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोनाळा, तुणकी, वरवट बकाल, जस्तगाव व संग्रामपूर येथेही ग्रामस्थांच्या सहभागातून विचारप्रबोधन, अभिवादन सभा, सामाजिक जागृतीचे उपक्रम राबविण्यात आले. माता रमाई यांचा त्याग, संयम व सामाजिक परिवर्तनासाठी दिलेला लढा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. सर्व ठिकाणी कार्यक्रमाची सांगता सरणागती गाथा घेऊन शांततामय वातावरणात करण्यात आली. तालुकाभर एकाच वेळी साजऱ्या झालेल्या या जयंती उत्सवामुळे सामाजिक एकता, बंधुता व समतेचा संदेश सर्वदूर पोहोचला.
