Breaking Ticker

सोनाळा ग्रामपंचायतीत विकासाची नवी पहाट



सरपंच हर्षल खंडेलवाल व ग्रामविकास अधिकारी शुभांगी धोटकर यांचा झंझावाती कारभार

संग्रामपूर प्रतिनिधी - सुमेध दामधर 

सोनाळा (०७ फेब्रुवारी २०२६) : संग्रामपूर तालुक्यातील बहुल आदिवासी भागातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या सर्वात मोठी व लोकसंख्येने वर्दळीची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सोनाळा गावाने अल्पावधीतच विकासाची नवी ओळख निर्माण केली आहे. युवा सरपंच हर्षल खंडेलवाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनेक गंभीर समस्या मार्गी लावत गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. श्री संत सोनाजी महाराज ‘ब’ दर्जा प्राप्त या संत नगरी त सुरक्षेचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा असल्याने सरपंच खंडेलवाल यांनी १ जानेवारीपासून जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची ऐतिहासिक सुरुवात केली. जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा सोनाजी नगर सोनाळा सह गावातील सर्व जिल्हा परिषद शाळांसह आदिवासीबहुल भागातील शाळांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला मोठा दिलासा मिळाला आहे. 

यासोबतच मुस्लिम समाजातील नागरिकांना कब्रस्तानात जाण्यासाठी नाल्यांतून ये-जा करावी लागत होती, ही गंभीर अडचण लक्षात घेऊन पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले, ज्यामुळे सामाजिक सलोखा व समानतेचा आदर्श निर्माण झाला आहे. सामाजिक, शैक्षणिक व मानवीय दृष्टीकोनातून कार्य करताना सरपंच हर्षल खंडेलवाल यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणींवर स्वतः लक्ष घालून त्या तात्काळ सोडविल्या, तसेच युवकांसाठी स्पर्धा परीक्षा ग्रंथालय उपलब्ध करून दिले. विशेष म्हणजे आपल्या कामाची कुठलीही जाहिरात न करता त्यांनी सातत्याने विकासकामे सुरू ठेवली आहेत. दिव्यांग बांधवांसाठी तर त्यांनी संवेदनशीलतेचा आदर्शच घालून दिला आहे. दरवर्षी पाच टक्के दिव्यांग निधीतून सायकल वाटप करून, साहित्य व विविध सवलती देण्यात येतात. २०२५–२६ या आर्थिक वर्षात ग्रामपंचायत सरपंच हर्षल खंडेलवाल व ग्रामविकास अधिकारी कु. शुभांगी धोटकर यांच्या पुढाकाराने सोनाळा गावातील १३९ दिव्यांग बांधवांना पिण्याच्या पाण्याच्या कॅनचे वाटप करण्यात आले, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली आहे. सरपंच हर्षल खंडेलवाल व ग्रामविकास अधिकारी शुभांगी धोटकर यांच्या समन्वयातून सोनाळा ग्रामपंचायतीने अल्पावधीतच विकास, सामाजिक बांधिलकी व प्रशासनातील पारदर्शकतेची नवी ओळख निर्माण केली असून, पंचक्रोशीत त्यांच्या कार्याची जोरदार चर्चा सुरू आहे. कामाच्या माध्यमातून ओळख निर्माण करणाऱ्या या जोडीमुळे सोनाळा ग्रामपंचायत आज आदर्श ग्रामपंचायतीकडे वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.