Breaking Ticker

नारायण सेवा संस्थेच्या बुलढाणा शाखेचा शुभारंभ; दिव्यांगास व्हीलचेअर देत सेवाभावाची प्रेरणादायी सुरुवात




संग्रामपूर प्रतिनिधी -सुमेध दामधर 

सोनाळा (१० फेब्रुवारी २०२६): दिव्यांगांच्या जीवनात आशेचा किरण देणाऱ्या नारायण सेवा संस्थेच्या नव्या शाखेचा शुभारंभ बुलढाणा जिल्ह्यात उत्साहात पार पडला. या शाखेच्या संयोजक आदरणीय श्रीमती शीला बोपटे मॅडम अनेक वर्षांपासून संस्थेशी निष्ठेने जोडल्या जाऊन गरजू, वंचित व दिव्यांग बांधवांच्या सेवेत समर्पित भावनेने कार्य करत आहेत. प्रभू इच्छेने व सेवाभावाच्या प्रेरणेने त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात संस्थेची नवीन शाखा स्थापन केली असून, या माध्यमातून परिसराती अधिकाधिक गरजूंपर्यंत नारायण सेवा संस्थेच्या मोफत सेवांचा लाभ पोहोचवण्याचा त्यांचा संकल्प आहे. या शाखेच्या कार्याची सुरुवात करताना दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेअर प्रदान करण्यात आली, ज्यामुळे उपस्थितांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ४५ वर्षांची सेवाभावी परंपरा लाभलेली नारायण सेवा संस्था नारायण सेवा संस्थेची स्थापना १९८५ साली पूज्य गुरुदेव श्री कैलाश जी मानव यांनी उदयपूर (राजस्थान) येथे केली. सुरुवातीला समाजातील लोकांकडून एक-एक मुठ धान्य गोळा करून सुरू झालेल्या या कार्याने आज देश-विदेशात सेवाभावाचा व्यापक विस्तार केला आहे. संस्थेमार्फत पोलिओ व सेरेब्रल पाल्सीग्रस्त दिव्यांग मुलांवर मोफत सुधारात्मक शस्त्रक्रिया करण्यात येत असून, आतापर्यंत ४ लाखांहून अधिक मुलांवर मोफत ऑपरेशन्स करण्यात आली आहेत. अपघातात हात-पाय गमावलेल्या दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव, व्हीलचेअर व सहाय्यक साधने दिली जातात. देशातील विविध शहरांमध्ये दर रविवारी मोफत कृत्रिम अवयव शिबिरे आयोजित केली जातात. उदयपूर येथील संस्थेच्या रुग्णालयात मूकबधिर, अंध व मंदबुद्धी मुलांसाठी शिक्षणाची सुविधा असून, दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्यासाठी संगणक, शिवणकाम व मोबाईल रिपेअरिंगसारखे मोफत प्रशिक्षण दिले जाते. तसेच वर्षातून दोन वेळा दिव्यांग जोडप्यांचे सामूहिक विवाह संस्थेमार्फत घडवून आणले जातात.

      नारायण सेवा संस्थेच्या देशभरात शेकडो शाखा कार्यरत असून, हैदराबाद व कैथल (हरियाणा) येथे स्थायी सेवा केंद्र सुरू आहेत. या सेवाभावी परंपरेचा विस्तार करत महाराष्ट्रातील शेगाव येथेही शाखा स्थापन करण्यात आली आहे. या शाखेमार्फत विविध सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी नागरिक पुढे येत संस्थेच्या निःशुल्क सेवांना हातभार लावत आहेत. याच सेवाभावी उपक्रमाचा भाग म्हणून दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी पी. एम. श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मुलांची शाळा, सोनाळा येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योगदान देण्यात आले, तसेच बुलढाणा व शेगाव येथे व्हीलचेअर वितरणाचे उपक्रम राबविण्यात आले. नारायण सेवा संस्थेच्या या मानवतावादी कार्यामुळे दिव्यांगांच्या जीवनात आत्मविश्वास व नवचैतन्य निर्माण होत असून, बुलढाणा जिल्ह्यातील नव्या शाखेमुळे गरजूंसाठी मदतीचा मजबूत आधार उभा राहत आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.