शहादा,दि.२७ (प्रतिनिधी)
"देशातील स्वयंपाकघरात तयार होणारे अन्न हे केवळ शारीरिक गरज पुरविणारे इंधन नसून ते एक उत्तम औषध आहे. धावपळीच्या युगात आपण आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करत आहोत, परंतु समतोल आहारातूनच आपली प्रकृती सुदृढ होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी आरोग्यमय जीवन जगण्यासाठी आपल्या पारंपरिक आहाराला प्राधान्य द्यावे," असा मोलाचा सल्ला ज्येष्ठ आहारतज्ज्ञ तथा निवृत्त उपप्राचार्य प्रा. डी.सी. पाटील यांनी दिला.
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयात आयोजित 'टुडेज लाइफस्टाईल अँड आयुर्वेदिक डाएट' या विशेष व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. किर्ती महाडिक होत्या. व्यासपीठावर प्रा. डॉ. सौ. जागृती पवार, प्रा. ए.जे. पाटील, प्रा. मोनिका गावित, प्रा. माधवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
*शारीरिक वयापेक्षा 'मेटाबॉलिक' वयाला महत्त्व द्या.-*
मार्गदर्शन करताना प्रा. पाटील पुढे म्हणाले की, "आनंदी व निरोगी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शारीरिक वयापेक्षा चयापचय (Metabolic Age) वयाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. शरीरातील चयापचय क्रिया जेवढी क्रियाशील राहील, तेवढेच शरीर दीर्घकाळ तरुण आणि निरोगी राहते. यासाठी संतुलित आहार अत्यंत महत्त्वाचा आहे."यावेळी प्रा. पाटील यांनी उपस्थितांना व्यायामाची एक अनोखी पद्धत सांगितली. "प्रत्येकाने दररोज किमान ४०० टाळ्या वाजवल्या पाहिजेत. टाळी वाजवल्यामुळे शरीरातील सर्व महत्त्वाच्या अवयवांचे दाबबिंदू (Acupressure points) उत्तेजित होतात, ज्यामुळे अवयव कार्यक्षम राहतात आणि आजारांपासून बचाव होतो," असे सांगत त्यांनी टाळ्या वाजवण्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवले.वाढत्या आजारांवर चिंता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, आज ३५ ते ४५ वयोगटातील तरुणांमध्ये हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाचे प्रमाण चिंताजनक रितीने वाढत आहे. याचे मुख्य कारण जंक फूड आणि फास्ट फूड हे आहे. रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि शरीराची कार्यक्षमता टिकवण्यासाठी बाहेरचे खाणे टाळून घरी तयार केलेले अन्न 'पूर्णब्रह्म' समजून सेवन करावे. तसेच, दुपारची झोप टाळून रात्री किमान ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रथम वर्ष बी.एड.ची विद्यार्थिनी निकिता पाटील हिने केले, तर उपस्थितांचे आभार द्वितीय वर्ष बी.एड.ची विद्यार्थिनी मोनाली अहिरे हिने मानले. या व्याख्यानाचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने घेतला.
