शहादा : शेठ व्ही. के. शाह विद्यामंदिर, शहादा येथे आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. ज्येष्ठ कवी, नाटककार व साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्यवैभव आणि सांस्कृतिक वारसा यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथपूजन करून करण्यात आली. याप्रसंगी संकुलाच्या प्राचार्या सौ. सुरेखा पाटील मॅडम, उपप्राचार्य पी. बी. पटेल सर, उपमुख्याध्यापक एस. आर. जाधव सर, पर्यवेक्षक सी. जी. पटेल सर, विपीन चौधरी सर, व्ही. ई. जावरे सर तसेच सर्व सांस्कृतिक समिती सदस्य उपस्थित होते.
प्राचार्या सुरेखा पाटील मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि विचारपरंपरेची ओळख असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून दैनंदिन जीवनात तिचा अधिकाधिक वापर करावा, तसेच वाचन संस्कृती जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. कुसुमाग्रज यांच्या साहित्यसंपदेचा आढावा घेत त्यांच्या काव्यलेखनातील सामाजिक जाण आणि राष्ट्रप्रेम विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आले.
या कार्यक्रमात इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनी कु.पर्णवी कुंभार व कु.कार्तिकी बोरसे या विद्यार्थिनींनी मराठी भाषेचे महत्व सांगताना कवितावाचन, अभंग तसेच मराठी भाषेच्या महत्त्वावर आधारित विचार मांडून वातावरण भारावून टाकले.
कार्यक्रमाचे नियोजन सर्व सांस्कृतिक समिती सदस्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समितीच्या वैशाली पाटील यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमात मराठी भाषेचा गौरव आणि साहित्यप्रेम यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
