Breaking Ticker

जिल्हा परिषद शाळेत त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी



शिक्षणातूनच समाज परिवर्तन शक्य – विद्यार्थ्यांना माता रमाई यांच्या त्यागाची प्रेरणा

संग्रामपूर प्रतिनिधी - श्री सुमेध दामधर 

समतेसाठी आयुष्य वेचणाऱ्या, संघर्षाला धैर्याने सामोरे जाणाऱ्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आयुष्यभर खंबीर साथ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा सोनाजी नगर सोनाळा येथे आज दिनांक सात फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुमेध भाऊ दामधर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश जामनेकर सर सह वरिष्ठ शिक्षक श्री भगवान बावणे स, सह शिक्षक श्री गजानन बावणे सर, शाळेचे शिपाई गोरखनाथ डांगे उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनीच्या वतीने सामूहिकरित्या त्याग मूर्ती माता रमाई यांच्या कार्याला अभिवादन केले. 

विद्यार्थ्यांनी माता रमाई यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रभावी भाषणे, मनोगते व घोषणांद्वारे त्यांच्या त्यागमय जीवनाचा आदर्श उभा केला. या वेळी शिक्षकवृंदांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून माता रमाई यांनी सहन केलेले हालअपेष्टा, समाजातील अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य, तसेच महिलांना शिक्षण व आत्मसन्मानाची जाणीव करून देण्यासाठी दिलेले योगदान यावर सविस्तर प्रकाश टाकला. “बाबासाहेबांच्या विचारांची मशाल पेटवून ठेवणारी रमाई म्हणजे नुसती पत्नी नव्हे, तर सामाजिक क्रांतीची प्रेरणास्थान होत्या,” असे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. लहानग्या विद्यार्थ्यांनी घोषणांच्या माध्यमातून समता, बंधुता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. यामुळे संपूर्ण शाळा परिसरात सामाजिक जाणीवेचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनातून संयम, त्याग, शिक्षणप्रेम व संघर्षाची शिकवण घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.