Breaking Ticker

शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात एक दिवसीय “कौशल्य विकास कार्यशाळा” संपन्



 वक्त्यांनी विद्यार्थ्याना दिली कौशल्य विकासाची गुरुकिल्ली.


शहादा - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम -उषा) अंतर्गत "विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळेचे" आयोजन पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी माजी अधिष्ठाता व सेवानिवृत्त प्राचार्य डॉ आर.एस.पाटील, धाराशिव येथील सचिन बाळासाहेब खोचरे, विधितज्ञ अडवोकेट प्रितम निकम, प्रा.माधुरी पवार, महाविद्यालाचे प्राचार्य डॉ एस.पी.पवार, प्राचार्य डॉ एम.के.पटेल, प्राचार्य प्रा.बी.के.सोनी, प्राचार्य प्रा.आर. एस.पाटील, प्राचार्या प्रा. कीर्ती महाडिक आदी उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वती, स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेच पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमधील गुणवत्ता सुधारणे आणि उच्च शिक्षणासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) ही योजना 2013 मध्ये सुरु केली. त्यानंतर या योजनेचा दुसरा टप्पा 2018 मध्ये राबविण्यात आला. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने या योजनेचा तिसरा टप्पा पीएम-उषा या नावाने 2023 मध्ये जाहीर करण्यात आला. या कार्यशाळेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, रोजगाराभिमुख कौशल्यांची जाणीव व मार्गदर्शन, उद्योजकता व आत्मनिर्भरतेस प्रोत्साहन, आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटल कौशल्यांची ओळख करून देणे हा आहे. यावेळी कार्यशाळेचे वक्ते, विधितज्ञ अडवोकेट प्रितम निकम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या पूर्वजांकडून आपण आदर्श घेतला पाहिजे कारण भारताची कौशल्य परंपरा अजून टिकून आहे म्हणून त्यांच्याकडून ही आपण कौशल्य वाढवू शकतात आणि विकास करू शकतात. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक पदवी पुरेशी नसून संवाद कौशल्य, तांत्रिक प्रावीण्य, नेतृत्व क्षमता आणि सकारात्मक दृष्टिकोन या गुणांचा विकास होणे म्हणजेच कौशल्य विकासाची गरज विद्यार्थ्यांसाठी अधिक महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य, डिजिटल साक्षरता आणि व्यक्तिमत्त्व विकास यांवर विशेष भर द्यावा. त्यानंतर वक्ते माजी अधिष्ठाता व सेवानिवृत्त प्राचार्य डॉ आर.एस.पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण त्यात गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक शिक्षण यामध्ये कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षण, बहुभाषिकता आणि मातृभाषेवर भर, संशोधन व नवोपक्रमाला प्रोत्साहन, डिजिटल शिक्षण इत्यादी. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) या दोन महत्त्वाच्या उपक्रमांचा संगम म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उभारलेला भक्कम पाया आहे. आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता संवाद कौशल्य, डिजिटल साक्षरता, नेतृत्वगुण, उद्योजकता आणि नवोपक्रम यांसारख्या कौशल्यांचा अंगीकार करणे आवश्यक आहे. पीएम-उषा आणि NEP 2020 या दोन्ही उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर, आत्मविश्वासू आणि जागतिक स्तरावर सक्षम नागरिक बनण्याची संधी उपलब्ध होत आहे. त्यानंतर सचिन बाळासाहेब खोचरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षण ही केवळ पदवी मिळविण्याची प्रक्रिया नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याचा प्रवास आहे. आपल्या क्षमतांचा शोध घ्या, नव्या संधींचा स्वीकार करा आणि देशाच्या प्रगतीत सक्रिय योगदान द्या. दैनंदिन जीवनात आपण केलेले कार्य हे आपण स्वतः समाधानी होत नाही तोपर्यत अविरत कार्य करावे. जिद्द व चिकाटीने जर कोणतेही कार्य केले तर ते पूर्ण होत असते. आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहायचं असेल सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन स्किल्सचा वापर करून विकास करावा. संवाद कौशल्य, रेझ्युमे लेखन, मुलाखत तंत्र, उद्योजकता विकास, वेळ व्यवस्थापन, संवाद कौशल्य, साहस, निर्णय क्षमता तसेच नेतृत्व गुण या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर शेवटी वक्त्या प्रा.माधुरी पवार यांनी सांगितले की, व्यक्तिमत्व विकास कसा घडवायचा असतो. स्वतःविषयी जागरूकता, स्वतःचे विश्लेषण, भावनिक बुद्धिमत्ता, प्रेरणा आणि ध्येय साध्य, निर्णयक्षमता, तणाव हाताळण्याची क्षमता, गंभीर विचार या सात बाबींवर मुख्यतः सखोल मार्गदर्शन केले. करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर किंवा प्रत्येक मजल सर करताना या स्किल्स खूप महत्त्वाच्या ठरतात. हे सगळे स्किल्स जर आत्मसात केले असतील तर एक यशस्वी करिअर घडवण्यात कोणतीच अडचण येत नाही. करिअर घडवण्यासाठी कौशल्यांचा विकास करण्याशिवाय पर्याय नाही. पण, कोणकोणत्या कौशल्यांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. करिअर घडवण्यासाठी स्किल हा महत्वाचा घटक आहे.

या सर्व वक्त्यांनी आजच्या काळात नुसतंच टेक्नॉलॉजीवर प्रभुत्व असून चालत नाही. पण, संभाषण कौशल्य (कम्युनिकेशन स्किल्स), लेखन कौशल्य, प्रेझेंटेशन स्किल्स, निर्णयक्षमता (डिसिजन मेकिंग स्किल्स), सर्जनशीलता (क्रिएटीव्ह स्किल्स), समूहात/लोकांबरोबर काम करण्याचं कौशल्य (टीम स्किल्स/ इंटरपर्सोनल स्किल्स), भावनिक बुद्धिमत्ता (इमोशनल इंटेलिजन्स), नेतृत्व गुण (लीडरशिप स्किल्स), वेळेचं नियोजन (टाइम मॅनॅजमेंट), समस्यांचं निरसन करण्याची क्षमता (सोल्युशन ओरिएंटेशन/ प्रॉब्लेम सोलविंग), नेटवर्किंग स्किल्स म्हणजेच लोकांशी असलेला आपला संबंध, तणाव हाताळण्याची क्षमता (स्ट्रेस मॅनॅजमेंट) असे आणि असे बरेच कौशल्य आज करिअर टिकवण्यासाठी आणि घडवण्यासाठी महत्त्वाची ठरतात. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी शंका मांडून समाधानकारक उत्तरे मिळवली. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून भविष्यातील करिअर नियोजनासाठी उपयुक्त दिशा मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. सदर कार्यशाळेसाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, सचिव श्रीमती ताईसाहेब कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक श्री मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मंडळाचे संचालक श्री मयूरभाई पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.अमित धनकानी यांनी केले तर आभार प्रा.हितेंद्र चौधरी यांनी मानले. सदर कार्यक्रमात विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील 150 पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.