Breaking Ticker

बोगस डॉक्टरवर यवत पोलिसांची कारवाई; सहा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त



दैनिक समीकरण दौंड प्रतिनिधी : गणेश दिवेकर

दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील आखाडेवस्ती परिसरात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीवर यवत पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ६ लाख ५४ हजार ९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी यवत पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलम ३१९(२) तसेच वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ मधील कलम ३३(१), ३३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ओमप्रकाश बन्सीलाल स्वर्णकर (रा. सदर बाजार, ता. हुर्दा, जि. भिलवाडा, राजस्थान) हा कोणतीही वैध अॅलोपॅथी वैद्यकीय पदवी नसताना, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी नसताना तसेच औषध विक्री व वापराचा परवाना नसताना कासुर्डी गावातील आखाडेवस्ती येथे बेकायदेशीरपणे क्लिनिक चालवत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती.

दि. २७ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ११:३० वाजण्याच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाईत विविध प्रकारची अॅलोपॅथी औषधे, इंजेक्शनच्या बाटल्या, सिरिंज, वापरलेले वैद्यकीय साहित्य तसेच मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जप्त करण्यात आली. यामध्ये सिप्ला कंपनीच्या गोळ्या, विविध इंजेक्शन बॉटल्स, डिस्पोजेबल सिरिंज, तसेच होंडा सिटी चारचाकी वाहनाचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रुग्णांची दिशाभूल करून स्वतःला डॉक्टर म्हणून भासवत होता. बेकायदेशीररीत्या वैद्यकीय व्यवसाय करून शासनाची व रुग्णांची फसवणूक करण्यात आली असून रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.

या प्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्र खामगाव येथील डॉ. आशिष शंकर शिरसे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा गोसावी या करीत आहेत.

या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.