Breaking Ticker

बालआनंद मेळाव्याने शाळा दणाणली! खेळ, कला आणि संस्कारांचा उत्सव अनुभवला



सुमेध दामधर संग्रामपूर प्रतिनिधी 

सोनाळा (१६ फेब्रुवारी २०२६): विद्यार्थ्यांच्या आनंदाला उसळी देणारा आणि संपूर्ण शाळा प्रांगणात उत्साहाची लाट उसळवणारा बालआनंद मेळावा मोठ्या दिमाखात पार पडला. रंगीबेरंगी सजावट, शिस्तबद्ध नियोजन आणि बालकेंद्रित उपक्रमांमुळे शाळेचे वातावरण अक्षरशः जिवंत झाले होते. मेळाव्यात विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ, चित्रकला, हस्तकला, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच बौद्धिक विकासाला चालना देणारे उपक्रम राबविण्यात आले. बालचिमुकल्यांनी आपल्या कलागुणांचे मनमोकळेपणाने सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. सर्वप्रथम सरस्वती मातेचे पूजन शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री सुमेध भाऊ दामधर सोनाळा केंद्रप्रमुख तसेच जिल्हा परिषद पिंगळी बुद्रुक शाळेचे मुख्याध्यापक श्री भीमराव वानखडे सर यांच्या हस्ते करण्यात आले. 

शालेय व्यवस्थापन अध्यक्ष, केंद्रप्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक सह पालक वर्गांच्या उपस्थितीत उद्घाटन प्रसंगी फीत कापून कार्यक्रमाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांचे समाधान आणि शिक्षकांचा उत्साह यामुळे हा मेळावा केवळ कार्यक्रम न राहता बालमन घडविण्याचा संस्कारक्षम उत्सव ठरला. शाळा व्यवस्थापन व शिक्षकवर्गाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले. खेळातून शिक्षण आणि शिक्षणातून आनंद हा संदेश देत बालआनंद मेळाव्याने उपस्थितांवर अविस्मरणीय ठसा उमटवला.

 यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुमेध भाऊ दामधर, केंद्रप्रमुख भीमराव वानखडे सर मुख्याध्यापक गणेश जामनेकर सर, वरिष्ठ शिक्षक भगवान बावणे सर यांनी विद्यार्थ्यांच्या व्यवसायाच्या स्टॉलला स्वतः भेट देऊन खरेदी करून त्यांना व्यवहारिक ज्ञानाची ओळख करून दिली. या कार्यक्रमाला शाळेचे शिपाई गोरखनाथ डांगे सह उपस्थितांमध्ये पालक वर्ग, महिला वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित राहून चिमुकल्यांचा या आनंदमय सोहळ्याला भरभरून प्रतिसाद दिला.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.