वडगाव मावळ मधील कान्हे फाटा येथे घडलेली घटना.
पुणे जिल्हा प्रतिनिधी अनिल कांबळे-
जनगणनेच्या कामासाठी निघालेल्या एका शिक्षिकेचा कंटेनरच्या भीषण धडकेत जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वडगाव मावळ मधील कान्हे फाटा येथे घडली आहे. मयत शिक्षिकेचे नाव दिपाली सुजित तांबे (रा. मंचर) असे असून त्या अहिरवडे येथील प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार दिपाली तांबे या मंचर येथील रहिवासी असून व्यवसायाने प्राथमिक शिक्षिका होत्या. काल बुधवारी त्या जनगणनेच्या शासकीय कामासाठी आपल्या वाहनावरून जात असताना कान्हे फाटा येथे भरधाव वेगात असलेल्या कंटेनर ने त्यांच्या दुचकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की,या धडकेत दिपाली तांबे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे मंचर परिसरासह शिक्षण क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासकीय कामावर जात असतानाच त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. वडगाव मावळ पोलीस पुढील तपास करत आहेत. यापूर्वी त्यांनी निगडे, नायगाव येथील प्राथमिक शाळेत काम केले असून त्यांची एक उपक्रमशील शिक्षिका अशी ओळख होती. यामुळे शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
