विद्यार्थ्यांच्या देखण्या वेशभूषा, भव्य प्रभातफेरी आणि शिवमय वातावरणाने जिंकली सर्वांची मने
संग्रामपूर प्रतिनिधी
सोनाळा ( १९ फेब्रुवारी २०२६) : सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या संत नगरी सोनाळा येथील सोनाजी नगरमधील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साह, अभिमान आणि शिवप्रेमाच्या जल्लोषात साजरी करण्यात आली. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाची सुरुवात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. सुमेध भाऊ दामधर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गणेश जामनेकर सर, वरिष्ठ शिक्षक श्री. भगवान बावणे सर तसेच शाळेचे शिपाई गोरखनाथ डांगे, अंगणवाडी सेविका, सौ. पद्माताई मोदे, मदतनीस सौ. नंदा इंगळे, सौ. सुषमा सातव, सौ.अर्चना पिंजरकर, सौ. शोभा भटकर, तसेच आशा वर्कर रिता बोदडे विद्यार्थी विद्यार्थिनी ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ शिक्षक वृंद प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. दुसरीतील श्रेयस ढोरे या विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांची देखणी वेशभूषा परिधान करून "मी शिवाजी राजे बोलतोय" अशा ठणठणीत आवाजात उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले, तर राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेत विद्यार्थिनी श्रीतिजा संतोष तायडे हिने आपल्या अभिनयाने आणि आत्मविश्वासाने सर्वांची मने जिंकली. पालक सौ. ज्योती तायडे सह ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांच्या शौर्यगाथा, स्वराज्याची प्रेरणा आणि आदर्श नेतृत्व याबाबत मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज भूमिका साकारलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर राजमाता जिजाऊ ची वेशभूषा धारण केलेल्या विद्यार्थिनी ने सोबत बऱ्याच मुलां मुलीने आपले मनोगत व्यक्त केले. देशभक्तीपर घोषणा, शिवगर्जना आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण शाळा परिसर शिवमय झाला.
कार्यक्रमाच्या समारोपाला गावातून भव्य प्रभातफेरी काढण्यात आली. ओठांवर शिवगर्जना आणि मनात शिवप्रेम घेऊन निघालेल्या या प्रभातफेरीने सोनाजी नगर परिसर भारावून गेला. उत्साह, संस्कार आणि शिवभक्तीचा संगम घडवणाऱ्या या भव्य-दिव्य सोहळ्याची आनंदमय वातावरणात दिमाखदार सांगता करण्यात आली.
