शहादा, दिनांक २६ फेब्रुवारी २०२६. येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव प्राणीशास्त्र अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय वर्ष विज्ञान, प्राणिशास्त्र या वर्गाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अनुसार एक दिवसीय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव मा. भैय्यासाहेब प्रा. श्री. संजयजी जाधव यांच्यासह कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव प्राणिशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. एम. झेड. चोपडा, पी. बी. बागल कला व विज्ञान महाविद्यालय, दोंडाईचा येथील प्राचार्य डॉ. पी. एस. लोहार, जिजामाता शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. बोराणे, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, नवापूर येथील प्राचार्य डॉ. दीपक जयस्वाल, प्रा. डॉ. श्रीमती बनसोडे, प्रा. डॉ. वासू भांडारकर, आमच्या महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. डी. डी. राठोड, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर. एन. गिरासे, या कार्यशाळेचे संयोजक प्रा. डॉ. आर. डी. पाटील यावेळी मंचावर उपस्थित होते. प्रारंभी कवयित्री बहिणाबाई चौधरी, हरितक्रांतीचे प्रणेते- महानायक-महाराष्ट्राचे माजी कार्य कुशल मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक साहेब, आमचे आधारवड-पितृतुल्य कर्मसाक्षी कै. नानासाहेब यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यशाळेला सुरुवात झाली.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. पी. एस. लोहार म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विद्यार्थ्यांवर खोलवर परिणाम झाला आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून अभ्यासक्रम निश्चित व्हायला हवा. नवीन शैक्षणिक धोरणामुळे पुस्तकांचा व एकूणच शिक्षणाचा दर्जा खालावण्याची चिंता वाटते. काही अंशी हे अत्यंत कटू पण सत्य आहे. हे टाळण्यासाठी पुनर्रचित अभ्यासक्रमाची नव्याने बांधणी होणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक महाविद्यालयातील नव संशोधक प्राध्यापकांनी पुढे यायला हवे असे सांगत कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. एम. झेड. चोपडा आपल्या वक्तव्यात म्हणाले की, या अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थीभिमुख अभ्यासक्रम निश्चित करणे आहे. नवनवीन अभ्यासक्रमांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी हा ही एक महत्त्वाचा उद्देश साध्य करायचा आहे. या अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेतून तो अधिक चांगला कसा होईल हा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करायचा आहे. या नवीन अभ्यासक्रमाचा एक महत्त्वपूर्ण उद्देश सांस्कृतिक वारसा संप्रेषण आणि शिक्षणासाठी स्थान आधारित संवर्धित वास्तविकता अनुप्रयोग सादर करणे ही आहे. असे सांगत त्यांनी या कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल व इथल्या उत्तम व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले.
आमच्या वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. डी. डी. राठोड म्हणाले की, या अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेच्या माध्यमातून मानव आणि त्यांचे प्राणी साथीदार यांच्यातील बंधाचे विविध पैलू अभ्यासले जावेत. विद्यार्थ्यांपर्यंत समान, सुरक्षित आणि विश्वसनीय सामग्री पोचवणे आपले काम आहे. पशुसंवर्धनासोबत पशुवैद्यकीय विज्ञानाचाही समावेश नवीन अभ्यासक्रमात व्हायला हवा. यासह पर्यावरण विज्ञानाच्या तज्ञ विषयाच्या क्षेत्रातील वर्तमान समस्या व समाधान यावरही सांगोपांग चर्चा व्हायला हवी. अशा नवनवीन विषयाशी संबंधित अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याबद्दल त्यांनी आशावाद व्यक्त करत या कार्यशाळेचे यजमान या नात्याने विद्यापीठाचे आभार मानले.
या एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनपर कार्यक्रमाचे अध्यक्ष व सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव मा. भैय्यासाहेब प्रा. श्री. संजयजी जाधव आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने अभ्यासक्रम अधिक परिणामकारक, कौशल्याधारित व विद्यार्थी केंद्रीय हवा. आज बदलत्या शैक्षणिक गरजांनुसार अभ्यासक्रम अद्ययावत करण्याचे महत्त्व अधोरेखित व्हायला हवे. यासह सध्याच्या अभ्यासक्रमातील त्रुटी नव्या संशोधन प्रवाहांची गरज तसेच प्रात्यक्षिक व क्षेत्रीय अभ्यासावर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे. प्राणीशास्त्र हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अभ्यासक्रम पुनर्रचना ही केवळ एक तांत्रिक प्रक्रिया न राहता ती विद्यार्थ्यांच्या भविष्याची नांदी ठरावी. त्यांच्या भविष्याची पायाभरणी व्हावी. विषयाचे ज्ञान हे केवळ पुस्तकी न राहता ते कार्यकुशलयुक्त व रोजगाराभिमुख असावे. मत्स्योत्पादन, मधुमक्षिका पालन, कृषी, गांडूळ खत या व अशा अनेक रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या अभ्यासक्रमांची आवश्यकता आहे. संशोधक विद्यार्थी तयार करत असतांना या अभ्यासक्रमातून नेट व सेट परीक्षांचाही अभ्यास व्हायला हवा. या सोबतच आपल्या परिसरातील प्राणी जीवन व पर्यावरणाचा समावेशही नवीन अभ्यासक्रमात करण्याचे सांगत त्यांनी या कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या.
*या संपूर्ण कार्यशाळेचे वर्तमानपत्र वृत्तांकन व विस्तृत विद्यापीठीय अहवाल लेखन प्रा. अजित चव्हाण यांनी केले. या पुनर्रचना कार्यशाळेची तांत्रिक बाजू प्रा. डॉ. साहेबराव ईशी, सूत्रसंचालन प्रा. आर. एन. गिरासे, प्रस्तावना या कार्यशाळेचे संयोजक प्रा. डॉ. आर. डी. पाटील तर आभार प्रकटन प्रा. जी. एस. चौधरी यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर बंधुंनी परिश्रम घेतले.*
