मुख्याध्यापकांवरील आरोपांवरून पुन्हा शाळाबंद आंदोलनाची ठिणगी१५ दिवसांत कारवाईचे दिलेले आश्वासन ठरले फोल; संतप्त पालक-नागरिकांचा ३० मार्चला शाळा बंदचा इशारा
गोरेगाव (प्रतिनिधी)
गोरेगाव येथील शहीद जाण्या तिम्या जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सध्या गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडले असून मुख्याध्यापक पी. आर. लोंढे यांच्यावर आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचे आरोप पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरापासून सातत्याने तक्रारी, निवेदने आणि आंदोलने करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने पालक व नागरिकांचा संताप आता शिगेला पोहोचला आहे.
या प्रकरणात प्रथम तक्रार २९ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आली होती. त्यानंतर १० जुलै २०२५ व १५ जुलै २०२५ रोजीही आर्थिक गैरव्यवहाराबाबत स्वतंत्र अर्ज सादर करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता १२ जुलै २०२५ रोजी झालेल्या पालक सभेत ठराव मंजूर करून संबंधित मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. पुढे २१ नोव्हेंबर २०२५ रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊनही प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र, या सर्व प्रयत्नांनंतरही कारवाईचा ठोस पत्ता नसल्याने ३ डिसेंबर २०२५ रोजी शाळा व्यवस्थापन समिती, पालक व नागरिकांच्या उपस्थितीत शाळाबंद आंदोलन छेडण्यात आले होते. त्या वेळी जिल्हा परिषद गोंदिया प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून १५ दिवसांत चौकशी पूर्ण करून संबंधितांवर कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिले होते.
परंतु, या आश्वासनाला आज तब्बल तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. “हे आश्वासन होते की केवळ वेळकाढूपणा?” असा संतप्त सवाल आता पालक वर्गातून उपस्थित केला जात आहे.
पालक व नागरिकांचा आरोप आहे की, विद्यार्थ्यांसमोर व पालकांसमोर दिलेले आश्वासन पायदळी तुडवले गेले आहे. “विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळून प्रशासन झोपले आहे का?” असा तीव्र प्रश्नही उपस्थित केला जात आहे. यामुळे आता पालक व नागरिकांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत ३० मार्च २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून शाळा पूर्णतः बंद ठेवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर पालक, नागरिक, शाळा समिती व व्यवस्थापन समितीचे सदस्य सहभागी होणार असून परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर थेट जबाबदारी टाकत स्पष्ट इशारा दिला आहे की, या आंदोलनामुळे जर शैक्षणिक नुकसान, जनहानी, धनहानी किंवा मालमत्तेची हानी झाली, तर त्यासाठी पूर्णतः वरिष्ठ प्रशासन जबाबदार राहील.
दरम्यान, सततच्या तक्रारी, आंदोलने आणि आश्वासनांच्या पोकळ घोषणांमुळे गोरेगाव तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य, शाळेची प्रतिमा आणि प्रशासनाची विश्वासार्हता या तिन्ही गोष्टींचा कस लागलेला असताना, आता प्रशासन खरोखरच जागे होणार का, की पुन्हा एकदा आश्वासनांचा खेळ सुरू राहणार—याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
