शहादा (प्रतिनिधी) : बियाणे, खते आणि कीटकनाशके विक्रीच्या वाढत्या स्पर्धेत आपले वेगळेपण सिद्ध करत शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने आता केळी रोप विक्रीच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. आनंद (गुजरात) येथील प्रसिद्ध आयकॉनिक इंटरनॅशनल कंपनीच्या 'जी-9 व्हरायटी' रोपांच्या विक्रीचा शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात करण्यात आला. खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष काशिनाथ पाटील यांच्या हस्ते पहिल्या रोपांच्या गाडीचे पूजन करण्यात आले. यावेळी शेतकरी शरद पाटील यांच्याकडे रोपांचा क्रेट सुपूर्द करून विक्रीचा श्रीगणेशा झाला. याप्रसंगी प्रा. डी.सी. पाटील, संचालक रवींद्र विठ्ठल पाटील, सुदाम सोमजी पाटील, विनोद चिंतामण पाटील, अंबालाल पाटील, विश्वनाथ पाटील, आयकॉनिक कंपनीचे मार्केटिंग हेड मच्छिंद्र माळी, मॅनेजर अनिल पाटील आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसराचे नेते बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तत्कालीन चेअरमन प्रा. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली, संघाचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत 2 लाख रोपांची नोंदणी झाली असून, मे अखेरपर्यंत 5 लाख रोपांच्या विक्रीचे उद्दिष्ट आहे. खरेदी केलेली रोपे थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवून दिली जाणार आहेत. 10 एप्रिलपर्यंत 16 रुपये प्रति रोप आणि त्यानंतर 18 रुपये प्रति रोप या दराने बुकिंग सुरू आहे.
"शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरत आम्ही दर्जेदार केळी रोपांची हमी देत आहोत. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या सुविधेचा लाभ घ्यावा."—अनिल अशोक पाटील (चेअरमन, खरेदी विक्री संघ, शहादा)
