श्री सुमेध दामधर प्रतिनिधी
संग्रामपूर ( 15 मार्च 2026) : तालुक्यातील सोनाळा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर सायबर गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी अवघ्या 36 तासांत अटक करत मोठे यश मिळवले. पुणे शहरातील भोसरी परिसरात गर्दीच्या ठिकाणी लपून बसलेल्या आरोपीचा तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेत पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणातील आरोपी ऋषिकेश श्यामगीर गिरी (वय २७, रा. सोनाळा ता. संग्रामपूर) याने पीडित महिलेचा सोशल मीडियावरून सतत पाठलाग करत तिचा विनयभंग केला. तसेच महिलेचे खासगी फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून तिला धमकावल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
या घटनेप्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ६७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमे तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप काळे यांनी तातडीने तपास पथक गठित करून आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले. पोलिस उपनिरीक्षक महादेव खोने, पोलिस कर्मचारी राहुल पवार व संजय सास्ते यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढत पुण्यातील भोसरी येथे सापळा रचून त्याला अटक केली. व पुढील कारवाईसाठी हे प्रकरण तामगाव पोलीस स्टेशन ला वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तामगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पंडितराव सोनवणे करीत असून न्यायालयाने आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास सध्या सुरू आहे.
