प्रतिनिधी/ सागर मूलकला सिरोंचा
सिरोंचा : तालुका आरोग्य विभागामार्फत येत्या १२ मार्च रोजी आशा स्वयंसेविका रिक्त पदांसाठी मुलाखती घेण्यात येणार असल्याचे पत्र आरोग्य विभागाने काढले आहे. मात्र या भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखावी व पात्र उमेदवारांवर अन्याय होऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
यापूर्वी सुमारे पाच महिन्यांपूर्वी तालुका आरोग्य विभागाने आशा स्वयंसेविका पदासाठी रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबविली होती. त्या वेळी पात्र उमेदवारांना अन्याय करून कमी गुण असलेल्या उमेदवारांना पात्र ठरवून नियुक्ती करण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर बाब समोर आली होती. त्यामुळे अन्यायग्रस्त उमेदवारांना सोबत घेऊन जिल्हा स्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्या वेळची संपूर्ण आशा स्वयंसेविका भरती प्रक्रिया रद्द केली होती.
त्यानंतर सुमारे पाच ते सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा नव्याने जाहिरात काढून १२ मार्च रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. या मुलाखती प्रक्रियेत पुन्हा एकदा पात्र उमेदवारांना अपात्र ठरवून अन्याय होऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुलाखती जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या देखरेखीखाली घेण्यात याव्यात तसेच संपूर्ण मुलाखत प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत पारदर्शक पद्धतीने पार पडावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही, असे मत व्यक्त तालुकाध्यक्ष मूलकला करण्यात आले.
दरम्यान, जर पात्र उमेदवारांवर अन्याय झाल्याचे आढळून आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी, या मागणीसाठीच ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे सिरोंचा तालुकाध्यक्ष सागर मूलकला यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे,
