सुमेध दामधर संग्रामपूर प्रतिनिधी
संग्रामपूर (09 मार्च 2026) : सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात हक्काचा जोडीदार मिळावा आणि त्यांच्या जीवनात नवी आशा निर्माण व्हावी या उदात्त हेतूने संग्रामपूर तालुक्यातील काटेल धाम येथे येत्या १३ मार्च रोजी भव्य ‘दिव्यांग वधू-वर परिचय मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, बुलढाणा, बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी, श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन जळगाव जामोद, श्री संत गुलाबबाबा संस्था काटेल धाम तसेच दिव्यांग क्रांती संघटना रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग आणि इतर दिव्यांग व्यक्तींना योग्य जोडीदार मिळावा, त्यांच्या सामाजिक पुनर्वसनाला चालना मिळावी आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळावी हा आहे. अशा प्रकारचा संग्रामपूर तालुक्यातील हा पहिलाच मोठा दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा असल्याने परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे. या मेळाव्याला नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे अध्यक्ष व बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, आमदार संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, नॅब महाराष्ट्र राज्य (नाशिक) अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, डॉ. अपर्णा कुटे, बुलढाणा अर्बन उपाध्यक्ष डॉ. किशोर केला, सहा. संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग मनोज मेरत, दिव्यांग क्रांती संघटना रायगड अध्यक्ष बी. जी. पाटील, मानस फाऊंडेशनचे प्रा. डी. एस. लहाने, श्रीक्षेत्र चांगेफळ संस्थानचे रामभारती महाराज, जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी प्रमोद येंडोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेल धामचे अध्यक्ष नरेंद्र पालांदुरकर, विदर्भ अध्यक्ष अशोक तायडे, नेत्रतज्ज्ञ डॉ. नंदू तायडे, सचिव मनीष कोळपकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात दिव्यांग वधू-वरांना एकमेकांना ओळखण्याची संधी मिळणार असून त्यांच्या आयुष्यात आनंद, सुसंवाद आणि स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करण्यासाठी साक्षीदार व्हावे, असे आवाहन बुलढाणा अर्बनचे उपाध्यक्ष डॉ. किशोर केला यांनी केले आहे.
