शहादा: पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान ,वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत गझलकार व गझल गायक प्रा. डॉ. सतिष भांडे व प्रा. डॉ. गजानन पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम के. पटेल यांनी भूषविले.
"गझल: शब्दातील सुरांची जादू" या विषयावरील व्याख्यानात डॉ.भांडे यांनी गझल चा अर्थ, स्वरूप, संकल्पना, इतिहास आणि हिंदी मराठी उर्दू गजलेची वर्तमान लोकप्रियता यावर सविस्तर विवेचन करीत सांगितले की गझल हा मुलत:अरबी फारसी परंपरेतून आलेला व पुढे उर्दू आणि हिंदी मराठी साहित्यात लोकप्रिय झालेला काव्य प्रकार आहे. प्रेम, विरह, वेदना तत्वज्ञान व मानवी जीवनातील सूक्ष्म भावना अत्यंत नाजूक आणि लयबद्ध पद्धतीने गझले मध्ये व्यक्त करता येतात. गझलचा उगम अरबी साहित्यात सातव्या व आठव्या शतकात दिसून येतो .नंतर फारसी अर्थात पर्शियन परंपरेत गझलचा विकास झाला .रुमी, हाफिज आणि सादि शिराजी यांनी गझलेला अध्यात्मिक आणि सुफी रंग दिला. मुस्लिम राजवटीच्या काळात गझल भारतात आली. विशेषत: मोहम्मद शहा यांच्या काळात उर्दू गझल फुलली . मिर्झा गालीब, मीर तकी मीर आणि दाग देहलवी यांनी उर्दू गझलेला उच्च शिखरावर नेले. एकविसाव्या शतकात बेगम अख्तर, मेहंदी हसन , जगदीत सिंह यांनी हिंदी उर्दू गझलेला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. सुरेश भट यांना मराठी गझलचे जनक मानले जाते. भीमराव पांचाळ यांनी मराठी गझल गायकीत विक्रम केला.
गझल गायकीच्या वैशिष्ट्यांसह काही गझल प्रात्यक्षिक स्वरूपात प्रा भांडे यांनी सादर केल्या. गझल कशी गावी, वाचावी व समजून घ्यावी याबद्दलचे विस्तृत व आदर्श प्रात्यक्षिक म्हणजे हे व्याख्यान होते.प्रा. डॉ. गजानन पाटील यांनी नव्या शैक्षणिक धोरणात पदवी आणि अभ्यासक्रम फलनिष्पत्ती या विषयावर विवेचन करीत नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कोणती ज्ञान आणि कौशल्य व क्षमता आत्मसात कराव्यात व प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमाचा पदवीशी व पर्यायाने जीवनाशी कसा संबंध जोडला जाईल आणि पर्यायाने राष्ट्र विकासात या सर्व गोष्टींची सांगड कशी घातली जाईल यावर अभ्यासपूर्ण विवेचन केले.अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांनी प्राध्यापक प्रबोधिनी च्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्राध्यापकाची राष्ट्रउभारणीतील भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ.एस .सिंदखेडकर व कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक प्रबोधिनीचे प्रमुख डॉ.विजयप्रकाश शर्मा यांनी केले . सूत्रसंचालन आणि आभार प्राध्यापक प्रबोधिनीचे सचिव प्रा एस. एस. पवार यांनी केले.
कार्यक्रमासाठी डॉ. वजीहअशहर, डॉ.एस. आर. उजगरे, प्रा. श्रीमती विजया पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच संस्थेचे अध्यक्ष मा.दीपक भाई पाटील, उपाध्यक्ष मा. जगदीशभाई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, मानद सचिव कमलताई पाटील व संचालक मयुर पाटील यांचे मार्गदर्शन व शुभेच्छा लाभल्या.
