शहादा – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या विद्यार्थी विकास विभाग, केसिआयआयएल आणि पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने "नवतंत्रज्ञान कौशल्य अभियान" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा येथे करण्यात आले होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम.के.पटेल, प्रमुख अतिथी, वक्ते व केसिआयआयएल जळगावचे सी.ई.ओ डॉ नवीन खंडारे, केसिआयआयएल जळगावचे कार्यक्रम समन्वयक कु.रोशनी जैन, स्टेमसेज टेकवर्ल्ड एलएलपी व निवाची सोल्युशनचे सह-संस्थापक हर्षल सोनवणे उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वती, स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेच पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यशाळेची सुरुवात झाली.
कार्यशाळेत पहिल्या सत्रात प्रमुख वक्ते डॉ नवीन खंडारे यांनी विद्यार्थ्याच्या कल्पनांचे ‘स्टार्टअप्स’ मध्ये रूपांतर करण्याविषयी एक अत्यंत उद्बोधक व्याख्यान दिले. ज्यामध्ये त्यांनी समस्येची ओळख, प्रत्यक्ष अमलबजावणी आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने असलेली सज्जता या बाबींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले. या पहिल्या सत्राचा मुख्य विषय “कॅम्पस ते कंपनी : कल्पनेपासून स्टार्टअपपर्यंतचा प्रवास हा होता. त्यानंतर दुसऱ्या सत्रात रोशनी जैन यांनी ‘इंन्क्यूबेशन सपोर्ट’ म्हणजेच उद्योजकीय विकासासाठीचे सहाय्य आणि स्टार्टअप्सना सक्षम करण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्याना केसिआयआयएलच्या इंन्क्यूबेशन परिसंस्थेची, उपलब्ध मार्गदर्शनाची आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रत्यक्ष कंपनीमध्ये रूपांतरित करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुनियोजित मार्गांची सविस्तर ओळख कारकून दिली. त्यानंतर तिसऱ्या सत्रात हर्षल सोनवणे यांनी स्टार्टअप परिसंस्थेतील स्वतःचे प्रत्यक्ष उद्योजकीय अनुभव आणि त्यातून शिकलेली व्यावहारिक धडे उपस्थितांशी सामायिक केले. विद्यार्थांचा प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ एम.के.पटेल यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सांगितले की, औषधनिर्माण क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून औषध निर्मिती करता येईल.
त्यावर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करून संशोधन करावे त्याचप्रमाणे औषधनिर्मिती करतांना विविध तंत्रज्ञानाचा वापर केला तर येणाऱ्या काळात त्याचा नक्कीच सर्वाना फायदा होईल. भारताला जगात एक विश्वसनीय स्तरावर पोहचवण्यासाठी सर्वांना नवीन तंत्रज्ञान अंगीकृत करून त्याचा वापर करून भारताची अर्थव्यवस्था ही अजून बळकट बनविण्यासाठी हातभार लावता येईल. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन नवतंत्रज्ञान कौशल्य कशा पद्धतीने विकसित करता येईल या कडे लक्ष केंद्रित करावे. तसेच या उपक्रमाचे मूल्य आणि त्याचा होणारा प्रभाव यावर विशेष मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेत १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता व त्याना त्याबाबतचे प्रमाणपत्र ही देण्यात आले. या कार्यशाळेसाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, मानद सचिव ताईसाहेब श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन, संयोजक, प्रा. योगेश रोकडे यांनी केले तर आभार प्रा.हितेंद्र चौधरी यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.सौ. अमृता पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
